राकसकोप जलाशयाचे संग्रहित छायाचित्र. pudhari photo
बेळगाव

पाणीसाठा मुबलक; जूनपर्यंत नो टेन्शन

‘राकसकोप’मध्ये गतवर्षीपेक्षा अर्धा फूट अधिक पाणी : ‘हिडकल’मध्येही समाधानकारक

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : शहराला रोज 100 एमएलडी (मिलियन लिटर प्रतिदिन) पाणी लागते. त्यापैकी 70 एमएलडी पाण्याचा पुरवठा राकसकोप जलाशयातून होतो तर 30 एमएलडी पाणी हिडकल जलाशयातून पुरवले जाते. समाधानाची बाब म्हणजे यंदा राकसकोप जलाशयात गतवर्षीपेक्षा अर्धा फूट अधिक पाणीसाठा असून शहराला जून मध्यापर्यंत पाणीपुरवठा करणे शक्य आहे. हिडकल जलाशयातही समाधानकारक पाणीसाठा आहे.

शहरात 48 प्रभागांमध्ये पाच दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जलवाहिनीला वारंवार लागणार्‍या गळत्या, चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे सुरु असलेले काम आदी कारणांमुळे नियमित पाणीपुरवठा करण्यात अडथळा येत आहेत. गेल्या महिन्यात हिडकल जलाशयातून शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य जलवाहिनीला गळती लागली होती. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे.

या जलाशयातून शहराला रोज 20 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. राकसकोप जलाशयातून 52 दशलक्ष लिटर पाणी पुरविले जाते. लक्ष्मीटेक येथील जलशुद्धीकरण प्रकल्पातून शहराला रोज 70 एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. तसेच बसवनकोळ्ळ प्रकल्पातून 30 एमएलडी पाणी शहरात सोडले जाते.

शहराचा पाणीपुरवठा राकसकोप व हिडकल जलाशयातील साठ्यावर अवलंबून आहे. दोन्ही जलाशयांत पुरेसे पाणी असले की शहराला जूनअखेरपर्यंत पाणी पुरविणे शक्य होते. यंदा राकसकोप जलाशयात 2460.65 फूट पाणीसाठा आहे.

गतवर्षी याच दिवशी 2460.9 फूट पाणी होते. गतवर्षीच्या तुलनेत सुमारे अर्धा फूट पाणीसाठा जादा आहे. हिडकल जलाशयातही समाधानकारक पाणीसाठा आहे. दोन्ही जलाशयांतील पाणी जूनपर्यंत पुरणार असल्याची माहिती एलअँडटी कंपनीने दिली. त्यामुळे पावसाळा सुरु होईपर्यंत शहराला नियमितपणे पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.

यंदा हिडकल आणि राकसकोप जलाशयात पुरेसा पाणीसाठा आहे. दोन्ही जलाशयांतून पुरेसे पाणी लक्ष्मी टेक व बसवनकोळ्ळ जलशुद्धीकरण प्रकल्पांत जमा होत आहे. मध्यंतरी गळतींमुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. पण, ही समस्या निवारण्यात आली असून शहराचा पाणीपुरवठा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. शहराला जूनपर्यर्ंत पुरेल इतका पाणीसाठा आहे.
धीरज उभयकर व्यवस्थापक, एलअँडटी कंपनी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT