बेळगाव : दीपप्रज्वलन करताना प्रा. डॉ. विनोद गायकवाड. शेजारी एम. एन. करडीगुद्दी, प्रा. डॉ. संजय कांबळे, अनंत लाड, प्रा. डॉ. मैजूद्दीन मुत्तवली, अश्विनी ओगले, प्रा. डॉ. मनीषा नेसरकर आदी मान्यवर.  Pudhari Photo
बेळगाव

बेळगाव : मराठी भाषा विद्यार्थ्यांनी न्यूनगंड दूर करावा

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

मराठी भाषा ही छत्रपती शिवाजी महाराजांची, तुकारामांची, सावरकरांची, ज्ञानेश्वरांची आहे. त्यामुळे या भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मराठी भाषेतून शिकणार्‍यांनी मनातला न्यूनगंड काढून टाकावा. मराठी भाषेतही अनेक संधी उपलब्ध आहेत. त्या स्वीकारून जीवनाचे सोने करावे, असे आवाहन प्रा. डॉ. विनोद गायकवाड यांनी केले. सरस्वती वाचनालयाच्या सभागृहात रविवारी (दि. 22) मराठीचे महत्त्व आणि रोजगाराची दिशा हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. गायकवाड होते. प्रा. डॉ. गायकवाड म्हणाले, सीमाभागातील विद्यार्थ्यांना मराठी बरोबरच कन्नड, इंग्रजी व हिंदी अशा भाषा बोलता व शिकता येतात. आपला जन्म हा काहीतरी भव्यदिव्य करण्यासाठी आहे. याची जाण ठेवा. मराठी भाषांतरकाराच्या अनेक संधी वृत्तपत्रे, सरकारी कार्यालय, न्यूज चॅनल्स आदी ठिकाणी उपलब्ध आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी मराठी विषयाला प्राधान्य द्यावे. मराठीचे संवर्धन करावे.

प्रा. डॉ. मनीषा नेसरकर म्हणाल्या, अधिकाधिक भाषा येणे ही आजची गरज आहे. सुसंस्कृत समाज निर्माण करायचा असेल तर भाषा समृद्ध होणे आवश्यक आहे. आपण भौतिकदृष्ट्या समृद्ध झालो पण अराजकता वाढली आहे. यावर उपाय म्हणजे साहित्य आहे. यूपीएससीची अंतिम परीक्षा ही मराठीतून देता येते हेही विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे. यानंतर विद्यार्थी व मान्यवर यांच्या प्रश्नोत्तरांतून संवाद झाला. चर्चेत अनुजा, अनंत लाड, यांच्यासह अन्य मान्यवरांनी भाग घेतला. संचालिका अश्विनी ओगले यांच्या स्वागत केले. आरपीडी महाविद्यालयाचे प्रा. महादेव खोत यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सोनाली कांगले यांनी आभार मानले. यावेळी वाचनालयाचे माजी अध्यक्ष माजी अध्यक्ष एम. एन. करडीगुद्दी, डॉ. मैजुद्दिन मुतवली, प्रा. डॉ संजय कांबळे व विविध महाविद्यालयातील मराठी माध्यमातून शिकणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक व शिक्षक उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT