निपाणी: पुढारी वृत्तसेवा कर्नाटक व महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्तवनिधी येथील ब्रम्हदेवाच्या विशाळी यात्रेस रविवार (दि. १८) रोजी अमाप उत्साहात प्रारंभ झाला. दिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. दरम्यान दिवसभरात हजारो भाविकांनी दर्शन घेतले. दरम्यान उद्या सोमवार (दि. १९) रोजी दु.४ वाजता रथोत्सवाने या यात्रेची सांगता होणार आहे.
रविवारी पहाटे ५.३० वाजता ब्रह्मदेवास तूप आणि शेंदुराचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी ८ वा. दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील,उपाध्यक्ष उद्योजक अभिनंदन पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी पार्श्वनाथ तिर्थकर यांना पंचामृत अभिषेक घालण्यात आला. दुपारी १२:३० वाजता तेल आणि शेंदुराचा अभिषेक झाल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी ६ वा. पालखी उत्सव सोहळा पार पडला. दरम्यान गवाणी व तवंदी येथील भाविकांतर्फे उद्या सोमवार दि. १९ रोजी दु. ४ वा.विहार रथोत्सवाने या यात्रेची सांगता होणार आहे.यावेळी सर्व धार्मिक विधी अनिल कलाजे,राजू चौगुले,धीरज पंडित यांच्या पौरोहित्याखाली पार पडले.
यावेळी दिवसभरात नांदणी मठाचे जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी, माजी आ.वीरकुमार पाटील, संजय पाटील,प्रकाश आवाडे,के. पी.मग्गेनावर,अभिनंदन पाटील, सहकाररत्न उत्तम पाटील, पंकज पाटील, डी.सी. पाटील,अमृता पाटील यांच्यासह मान्यवरांनी ब्रह्मदेवाचे दर्शन घेतले.यावेळी चेअरमन आर. बी. खोत, व्हा. चेअरमन सुंदर पाटील,सचिव बाळासाहेब मगदूम,जाॅईंट सेक्रेटरी आनंद उगारे, प्रा. विलास उपाध्ये, राजू पाटील, माणिक रोट्टी, अशोक जैन, सुनील बल्लोळ, राजेंद्र कंगळे, संजय निलजगी, सुनील अम्मनावर, सुधाकर नाडगे यांच्यासह कर्नाटक आणि महाराष्ट्रातील श्रावक- श्राविका उपस्थित होत्या. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सीपीआय बी.एस. तळवार यांचा नेतृत्वाखाली शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. याशिवाय निपाणी आगारातर्फे जादा बसेसची सोय करण्यात आली होती.