बेळगाव

Belgaum news: 'अग्नि'शमनला जागाटंचाईची 'धग'!

'स्मार्ट' बेळगावसाठी नवे अग्निशमन केंद्र, १०.४४ कोटी मंजूर; मात्र जागेअभावी प्रकल्प वर्षभरापासून रखडला

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : वेगाने वाढणारी लोकसंख्या, शहराचा सातत्याने होत असलेला विस्तार आणि आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना बेळगाव शहरासाठी नवीन अग्निशमन केंद्र उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाने यासाठी १०.४४ कोटी रुपयांच्या निधीस वर्षभरापूर्वी मंजुरी दिली असली, तरी जागेअभावी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडला आहे. योग्य जागा उपलब्ध झाल्यानंतरच नवीन अग्निशमन केंद्र सुरू होऊ शकणार आहे. त्यामुळे कोणी जागा देते का जागा, असे म्हणण्याची वेळ अग्निशमन विभागावर आली आहे.

सध्या संपूर्ण बेळगाव शहर आणि तालुका केवळ एका अग्निशमन केंद्रावर अवलंबून आहे. शहरातील आग विझविण्याबरोबरच ग्रामीण भाग आणि इतर तालुक्यांमध्येही अग्निशमन दलाला धाव घ्यावी लागत असल्याने यंत्रणेवर मोठा आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होत असून नुकसानीचे प्रमाण वाढत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

बेळगाव उत्तर आणि दक्षिण भागातील अरुंद रस्ते, वाढती रहदारी कोंडी आणि शहरातील सिग्नल यंत्रणेमुळे अग्निशमन दलाच्या वाहनांना मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा आग लागल्यानंतर माहिती मिळाल्यावर तातडीने बंब रवाना केला जातो. मात्र घटनास्थळी पोहोचेपर्यंत आगीने विक्राळ रूप धारण केलेले असते. त्यामुळे आर्थिक तसेच जीवितहानीची शक्यता वाढत असल्याचे अग्निशमन विभागाचे म्हणणे आहे.

बेळगाव शहरात तीन विधानसभा मतदारसंघ असून शहराभोवती दाट लोकवस्तीची अनेक गावे आहेत. शहराचा विस्तार झपाट्याने वाढत असताना अग्निशमन सुविधांचा विस्तार मात्र झालेला नाही. हलगा सुवर्णसौध परिसरात नवीन अग्निशमन केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र आवश्यक जागा उपलब्ध न झाल्याने तो प्रस्ताव रेंगाळला आहे.

चार केंद्रांची गरज

वाढत्या शहरीकरणाचा विचार करता बेळगावमध्ये किमान चार विभागीय अग्निशमन केंद्रांची आवश्यकता आहे. उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भागात स्वतंत्र अग्निशमन केंद्रे उभारण्यात आल्यास आपत्कालीन प्रतिसादाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो, असे अग्निशमन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. विशेषतः शहराच्या बाहेरील भागात केंद्रे उभारल्यास राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख रस्त्यांद्वारे घटनास्थळी जलद पोहोचणे शक्य होणार आहे.

तीन जागांची पाहणी

नवीन अग्निशमन केंद्रासाठी कंग्राळी बी.के., ऑटो नगर, कणबर्गी तसेच इतर काही परिसरांची पाहणी करण्यात आली होती. मात्र अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी किमान दीड एकर जागा आवश्यक असून तितकी सरकारी जमीन उपलब्ध होत नसल्याने प्रशासनापुढे आव्हान आहे. जिल्हा प्रशासन त्यामुळे जागेच्या शोधात आहे.

गरज का?

शहरातील वाढत्या आगीच्या घटनांमुळे चिंता आहे. रहिवासी भागातील अरुंद गल्ल्या, वाढती व्यापारी वसाहत, औद्योगिक परिसरांचा विस्तार आणि वाहतुकीची समस्या लक्षात घेता अग्निशमन सेवेचे जाळे मजबूत करणे काळाची गरज आहे. उद्यमबाग, होनगा औद्योगिक वसाहत वाढली आहे. त्यामुळे शहरात आणखी केंद्रे सुरू झाल्यास आपत्कालीन परिस्थिती हाताळणे अधिक सुलभ होणार असल्याचे मत औद्योगिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT