बेळगाव : सौंदत्ती यल्लम्मा मंदिराच्या विकासाचे नियोजन आणि निधी देण्याचे श्रेय राज्याचे पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांना जाते. खासदार जगदीश शेट्टर यांना नव्हे. ते उगाचच श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली. त्या मंगळवारी (दि. 3) आपल्या कार्यालयात पत्रकारांशी बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, मुख्यमंत्रीपद सांभाळलेल्या खासदार शेट्टर यांना सामान्यज्ञान नाही काय? खासदार होताच त्यांनी एक पत्र दिले. म्हणून कोट्यवधी रुपये मंजूर होतात का? त्यांनी वाट्टेल ते दावे करु नयेत. जिल्ह्यात अनेक मंदिरे आहेत. निधी आणून त्यांचा विकास करावा. मंत्री पाटील यांचे घराणे सौंदत्ती यल्लम्मादेवीचे भक्त आहे. त्यांनी सौंदत्तीच्या विकासासाठी योजना तयार करून केंद्र सरकारला प्रस्ताव सादर केला. त्यासाठी स्वतः प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नातून हे अनुदान मिळाले. त्यामुळे, याचे संपूर्ण श्रेय मंत्री पाटील यांनाच जाते, असे त्यांनी सांगितले.
हिडकल धरणातून धारवाडच्या औद्योगिक वसाहतीत पाणी नेण्याच्या योजनेशी मृणाल शुगर्सचा कोणताही संबंध नाही. बेळगावात जे काही वाईट घडेल ते माझ्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिडकल धरणातून पाणी कोण नेत आहे? ते का घेऊन जात आहेत? मला माहीत नाही. आमचे नाव याच्याशी जोडले जात आहे हे ऐकून मला आश्चर्य वाटते. हे पाणी आपल्या साखर कारखान्यासाठी आवश्यक नाही. आमच्या कारखान्याजवळच एक ओढा आहे. त्याचबरोबर आम्ही पुरेशा कूपनलिका खोदल्या आहेत. तिथे भरपूर पाणी आहे. आम्हांला पाणी नको आहे. ही योजना कधी अंमलात आणली गेली किंवा ती कोणी आखली हे मला माहित नाही. मी कधीही बेळगावच्या लोकांच्या भावनांशी खेळणार नाही, असे मंत्री हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले.