बेळगाव : फेसबुकवर आलेल्या लिंकला क्लिक केल्यानंतर ऑनलाईन भामट्यांनी शेअर मार्केटच्या नफ्याचे आमिष दाखवत 5 लाख गुंतवणुकीवर 2 लाखांचा त्वरित नफा देऊन एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला तब्बल एक कोटी सात लाख रुपयांना गंडवले आहे. कॅम्प परिसरातील राहणार्या या इंजिनिअरने तशी तक्रार शहर सीईएन विभागात केली आहे. त्यामुळे ऑनलाईन फसवणूक आणि जादा परताव्याच्या आमिषाला केवळ अल्पशिक्षित लोकच बळी पडतात असे नाही, तर उच्चशिक्षितही फसू लागले आहेत, हे सिद्ध झाले आहे.
शहरातील कॅम्प परिसरात राहणारा इंजिनिअर तरुण एका अधिकृत शेअर मार्केटिंग अॅपमधून गुंतवणूक करत होता. डिसेंबर 2024 मध्ये त्याला फेसबुकवर एक लिंक आली. यावर क्लिक केल्यानंतर 044 अॅबान्स ट्रेड अॅकॅडेमी नावाने व्हॉटस्अॅप ग्रुप तयार झाला. यामध्ये तो देखील सदस्य बनला. यानंतर ऑनलाईन भामट्यांनी जादा परताव्याचे आमिष दाखवून त्याला गुंतवणुकीस भाग पाडले.
पहिल्यांदा या तरुणाने 5 लाखांची गुंतवणूक केली. यावर भामट्यांनी त्याला तातडीने 2 लाख रुपयांचा नफा दिला. यानंतर त्यांनी सदर तरुणाला थोडी थोडी अशी रक्कम गुंतवणुकीची सवय लावली. 28 जानेवारी 2025 ते 25 मार्च अखेर या भामट्यांनी त्याच्याकडून तब्बल 1 कोटी 7 लाख 55 हजार रुपये गुंतवणूक करून घेतले. एक कोटीच्या रक्कम गुंतवणुकीनंतर त्याच्या खात्यावर 11 कोटी रुपये जमा झाल्याचे दिसत होते. त्यामुळे आपल्या खात्यावर नफा जमा होतोय, असाच समज त्या इंजिनिअरचा होता. परंतु, जेव्हा त्याने खात्यावरील पैसा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा प्रत्यक्ष बँक खात्यावर काहीच रक्कम नसल्याचे उघडकीस आले.
ज्या अॅपद्वारे इंजिनिअर सर्व आर्थिक व्यवहार करत होता, त्या अॅपचालकांना त्याने आपल्या खात्यावर रक्कम जमा झाली नसल्याचे सांगितले. त्यावेळी भामट्यांनी ‘तुला 11 कोटी हवे असतील, तर आणखी दोन कोेटी रुपये खात्यावर जमा कर,’ असे सांगितले. त्यावेळी सदर तरुणाच्या डोक्यात प्रकाश पडला व आपण फसलो गेलो असल्याचे ध्यानात आले. त्यानंतर त्याने सीईएन पोलिसांत जाऊन तक्रार दिली. सीईएनचे उपअधीक्षक जे. रघु व निरीक्षक बी. आर. गड्डेकर तपास करीत आहेत.