बेळगाव : सोशल मीडियावर मैत्री केल्यानंतर पळून जाऊन लग्न करूया असे सांगून तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाविरोधात शहर सायबर गुन्हे विभागात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकारामुळे सोशल मीडियावर मैत्री करणाऱ्या त्या तरुणीला नाहक मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सोशल मीडियावरून मैत्री करणाऱ्यांनी खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
एका तरुणीला सोशल मीडियावर डिसेंबर 2025 मध्ये एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्या रिक्वेस्टला तरुणीने अनुमती दिली. त्यानंतर या दोघांमध्ये एकमेकाला संदेश देण्याचे सुरू झाले. मात्र त्यानंतर त्या तरुणाने तिला ब्लॅकमेल करण्यासाठी अचानक दुसऱ्याच एका सोशल मीडिया खात्यावरून रिक्वेस्ट पाठविली. त्यावेळी त्याने आपला फोन हरवला आहे, असे सांगितले.
तरुणीने त्या तरुणावर विश्वास ठेवला आणि दुसऱ्या सोशल मीडिया खात्यावरून संदेश पाठवण्यास सुरुवात झाली. त्यानंतर संदेश पाठविणे, फोन, व्हिडिओ कॉल सुरू झाले. एकमेकांचे मोबाईल क्रमांकाचे पाठवून देण्यात आले. त्यानंतर त्या तरुणाने व्हिडिओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग घेतले होते. त्यानंतर त्यान तरुणाने आपण पळून जाऊन लग्न करूया असे सांगून त्या तरुणीवर दबाव घातला. मात्र तिने त्याला नकार दिला. त्यामुळे तरुणाने व्हिडिओ कॉल, स्क्रिन रेकॉर्डिंग तरुणीच्या कुटुंबीयांना व गावातील काहीजणांना पाठविले. या प्रकारानंतर त्या तरुणीच्या कुटुंबियांनी शहर सायबर गुन्हे विभागात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.