अंकली : भारताने जगाला ‘आपलेपणाचे तत्त्व’ दिल्यास भारत खऱ्याअर्थाने विश्वगुरू बनेल. आपल्या परंपरेत ज्याला ‘ब्रह्म’ किंवा ‘ईश्वर’ म्हटले जाते, त्यालाच आधुनिक विज्ञान ’युनिव्हर्सल कॉन्शिअसनेस’ असे संबोधते. समाज केवळ कायद्याने नियंत्रित होत नाही, तर तो सामाजिक सहानुभूतीवर चालतो. समाजात आपलेपणाची भावना कायम ठेवणे आवश्यक असून तीच समाजाला एकत्र बांधते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
येडूर (ता. चिकोडी) येथील वीरभद्र देवस्थान, काडसिद्धेश्वर संस्थान मठातर्फ डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य स्वामी यांच्या उपस्थितीत पाठशाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन, गो-शाळेतील गो-आहार तुलाभार तसेच पदवी विद्यार्थ्यांच्या संवाद आणि मार्गदर्शन कार्यक्रमात भागवत बोलत होते. हुक्केरी मठाचे डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी, गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी उपस्थित होते.
भागवत पुढे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशवराव हेडगेवार यांनी ‘वंदे मातरम’ व ‘भारत माता की जय’ या घोषणांद्वारे देशभक्तीची भावना रुजवली. आता समाज राजकीयदृष्ट्या एकजूट राहिलेला नाही. सामान्य नागरिकांनीही राजकीयदृष्ट्या जागरूक असणे आवश्यक आहे.
डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य स्वामी म्हणाले, मानवाने इतरांच्या सुख-दुःखात सहभागी होत आपले करिअर निवडावे. समाजात वाढत्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर योग्य दिशा देण्यासाठी विद्यार्थ्यांनी लहानपणापासून समाजसेवेचे व्रत स्वीकारावे. डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी यांनीही मनोगत व्यक्त केले.
श्रीकांत उमराणे यांनी स्वागत केले. गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी यांनी भागवत यांचा परिचय करून दिला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना भागवत यांनी उत्तरे दिली. कार्यक्रमास संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित होते. शिवलिंगय्या अल्लायनवर यांनी सूत्रसंचालन केले, तर शिवानंद हकारे यांनी आभार मानले.