बंगळूर : राज्यातील मतदार यादी विशेष पुनरीक्षण अभियानात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला आहे, असा आरोप करत भाजप आणि निजदने सध्याची विशेष पुनर्तपासणी प्रक्रिया (एसआयआर) रद्द करून पुन्हा पुनर्तपासणी करण्याची विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि प्रल्हाद जोशी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. ६) एनडीएच्या नेत्यांनी नवी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांची भेट घेऊन, कर्नाटकातील गैरप्रकाराबाबत कागदपत्रांसह तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सुरू असलेल्या विशेष पुनरीक्षण प्रक्रियेबाबत आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अहवाल गोळा करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री कुमारस्वामी आणि प्रल्हाद जोशी यांनी सर्व कागदपत्रांचा समावेश असलेला एक व्यापक अहवाल तयार केला आहे.
या दोन्ही नेत्यांनी पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक घेऊन सविस्तर विनंतीपत्र तयार केले आहे, ते सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांकडे सादर करून पुन्हा राज्यात पुनर्तपासणीची मागणी करणार आहेत.
राज्य सरकार आपल्या राजकीय फायद्यासाठी मतदार यादी पुनर्तपासणी प्रक्रियेचा वापर करत आहे. घरोघरी जाऊन पडताळणी करण्याऐवजी, स्थानिक मतदान केंद्रावरील अधिकारी मतदारांना अर्ज भरण्यासाठी एकत्र जमा करत आहेत. ही प्रक्रिया पारदर्शक नाही आणि राज्य सरकारच्या दबावामुळे अधिकारी पक्षपातीपणा करत आहेत.
अधिकारी घरोघरी जाण्याऐवजी, बूथ स्तरावरील अधिकारी लोकांना सार्वजनिक ठिकाणी, मशिदींमध्ये एकत्र करून अर्जांचे वाटप करत आहेत. हे पूर्णपणे नियमांच्या विरोधात असल्याने, ही प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.