(Pudhari File Photo)
बेळगाव

Karnataka Politics: सिद्धरामय्या नाराज; खातेवाटप चर्चेत सहभागी होण्यास नकार

नवीन मंत्र्यांना खातेवाटपासह कोणत्याही मुद्द्यावर ते चर्चा करणार नाहीत, असा हायकमांडला संदेश

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : मंत्रिमंडळ विस्तारानंतर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या नाराज आहेत. त्यांनी हायकमांडला नवीन मंत्र्यांना खातेवाटपासह कोणत्याही मुद्द्यावर ते चर्चा करणार नाहीत, असा संदेश पाठविला आहे.

मंत्रिमंडळ विस्तारात उत्तर कर्नाटकातील कुरुब समाजाला प्रतिनिधित्व दिले पाहिजे. राज्यातील उत्तर कर्नाटक भागात कुरुब समाज मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे सामाजिक न्यायाच्या तत्त्वानुसार त्या भागाला संधी दिली पाहिजे, असा युक्तिवाद त्यांनी केला होता.

विशेषतः हावेरी जिल्ह्यातील ब्याडगी मतदारसंघाचे ज्येष्ठ आमदार बसवराज शिवन्ननवर यांना मंत्रिपद दिले पाहिजे. विस्तारात वयोमर्यादेचा विचार केला जात असेल, तर त्याऐवजी राघवेंद्र हिटनाळ यांना संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती; मात्र हायकमांडने त्यांची विनंती मान्य केली नाही. त्यानंतर त्यांनी बसवराज शिवन्ननवर यांच्यासाठी आग्रह धरला होता. त्यांचा समावेश न केल्यास शपथविधी सोहळ्याला येणार नाहीत, असा इशारा दिला होता. त्यांनी त्यांची मागणी मान्य केली नाही. यामुळे सिद्धरामय्या शपथविधी सोहळ्यापासून दूर राहिले.

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी खातेवाटपावर चर्चा करण्याबाबत आमंत्रण दिले होते. त्यालाही सिद्धरामय्या यांनी प्रतिसाद दिला नाही. यामुळे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी प्रदेश काँग्रेस प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला यांना माहिती दिली. यानंतर सुरजेवाला यांनी सिद्धरामय्या यांना फोन केला. त्यांनी सुरजेवाला यांना धारेवर धरले. सिद्धरामय्या यांच्या संतापाने चकित झालेल्या सूरजेवाला यांनी सांगितले की, ते सर्व मुद्द्यांवर त्यांच्याशी वैयक्तिकरीत्या बोलतील आणि म्हणूनच ते बंगळूरला येत आहेत. दरम्यान, सिद्धरामय्या यांनी त्यांना भेटण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. ते म्हैसूरला जाणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT