बेळगाव : म. ए. समिती नगरसेवकांना सभागृहात बोलू दिले नाही. ही लोकशाहीची हत्या आहे. निवडणुकीच्या काळात मराठी भाषेत मते मागणार्या लोकप्रतिनिधींनी याचा विचार करावा, अशी टीका म. ए. युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी केली आहे.
महापालिकेत समिती नगरसेवकांना मराठी कागदपत्रांच्या मागणीवर बोलू दिले नसल्याच्या घटनेचा निषेध करुन ते बोलत होते. राष्ट्रीय पक्षातील लोकप्रतिनिधींना आम्ही आमच्या भाषेत कागदपत्रे द्या, अशी मागणी करत आहोत. पण, नगरसेवकांना सभागृहात बोलू दिले जात नाही. त्यांना बाहेर घाला, असे राष्ट्रीय पक्षांचे नगरसेवक सांगतात. त्यामुळे, त्यांचा माज उतरवावा लागेल.
मराठी लोक राष्ट्रीय पक्षातून निवडून आले आहेत. महापौरांना निवेदन दिले तरी समिती नगरसेवकांना मराठीतून बोलू देत नाही. याचा आम्ही निषेध करत आहोत. निवडणुकीत मराठीचा वापर करणार्या लोकप्रतिनिधींनी याचा विचार करावा, असा इशारा त्यांनी दिला.