बेळगाव : मुख्य बाजारपेठेतील कांदा मार्केटमधील प्लास्टिक साहित्य, स्टेशनरी आणि चुरमुरे विक्रीच्या दुकानाला शॉर्टसर्किटने आग लागून दोन्ही दुकाने आगीत भस्मसात झाली आहेत. तसेच दुसर्या घटनेत सदाशिवनगर, दुसरा क्रॉस येथील बेकरीला आग लागून नुकसान झाले. या दोन्ही घटना शुक्रवारी (दि. 30) मध्यरात्री घडल्या. या दोन्ही घटनांमध्ये मोठे नुकसान झाले असून सुदैवानेच कोणतीही जीवितहानी झाली नाही.
कांदा मार्केट येथील दिलीप कलघटगी यांच्या मालकीचे दुकान भाड्याने दिले आहेे. या दुकानांमध्ये विक्रम सिंग यांनी प्लास्टिक वस्तूआणि स्टेशनरीचा व्यवसाय सुरू केला होता. या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य भरण्यात आले होते. शुक्रवारी मध्यरात्री शॉर्टसर्किटने आग लागली. आगीने बघताबघता रौद्ररूप धारण केले. सदर घटना काही नागरिकांच्या निदर्शनास येताच घटनेची माहिती तातडीने अग्निशामक दलाला देण्यात आली. दुकानांमध्ये प्लास्टिक असल्यामुळे आग भडकली होती.
त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे अग्निशामक दलाला अशक्य झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल सात बंब मागविण्यात आले होते. मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान परिश्रम घेत होते. अखेर सकाळी आठ वाजता आग आटोक्यात आली. या दुकानाला लागून असलेले चुरमुरे विक्रीचे दुकानदेखील आगीत भस्मसात झाले. या घटनेत तब्बल वीस लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. अग्निशामक दलाचे शिवाजी कोरावी यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी आग आटोक्यात आणली. एसीपी जोतिबा निकम यांना या घटनेची माहिती समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी पाहणी केली.
दुसरी घटना सदाशिवनगर दुसर्या क्रॉसजवळी घडली. या ठिकाणी असलेल्या बेकरीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यामुळे बेकरीतील लाखो रुपयांचे साहित्य तसेच यंत्रसामग्री आगीत जळून खाक झाली. शेजार्यांना आगीची माहिती मिळताच त्यांनी बेकरीच्या मालकाला फोन करून माहिती दिली. विनोद कदम यांनी तात्काळ अग्निशामक दलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अनेकवेळा फोन करूनही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे, विनोद कदम यांनी कर्मचारी आणि शेजार्यांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचा भडका उडाल्यामुळे अग्निशामक दलाने पुन्हा फोन केला. तोपर्यंत आगीत संपूर्ण साहित्य जळाले. विनोद कदम यांनी अग्निशामक दलाच्या या निष्काळजीपणाबद्दल नाराजी व्यक्त केली. या घटनेत सुमारे लाखो रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली. एपीएमसी पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.