बेळगाव : शिवम असोसिएटस् आणि शिवानंद निलण्णावर यांच्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांत तब्बल ६६० कोटी रुपयांची तूट आढळून आली आहेत. या व्यवहारांतून ४०,७०० गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. या प्रकरणाची चौकशी युद्धपातळीवर सुरू असून, लाभांश घेतलेल्यांनाही नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती सीआयडीचे डीआयजी भीमाशंकर गुळेद यांनी दिली. रविवारी (दि. ७) सर्किट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, शिवम असोसिएटस्च्या माध्यमातून आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर ठेवी स्वीकारण्यात आल्या. प्रत्यक्षात कोणत्याही व्यवसायातून नफा मिळालेला नसताना जुन्या ठेवीदारांना नवीन गुंतवणूकदारांचे पैसे व्याज व परतावा म्हणून दिले जात होते. अशाप्रकारे साखळी पद्धतीने व्यवहार सुरू असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक बँक खाती, मालमत्ता, सोने, शेअर्स तसेच स्थावर संपत्तीचा तपशील तपासण्यात आला आहे. सुमारे ४०० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मागोवा लागला असून, त्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. शिवानंद याच्या खात्यावर सुमारे ५५ कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच महागड्या दोन मर्सिडीज कारसह विविध राज्यांमध्ये नोंदणी झालेल्या वाहनांचाही तपास सुरू आहे. एकूण २,४०० कोटी रुपये गुंतवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, असे त्यांनी सांगितले.
सीआयडीने संबंधितांची तब्बल ३० बँक खाती तपासली असून, त्यापैकी सात खात्यांतून सर्वाधिक आर्थिक व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. शिवानंद याच्या खात्यांमधून ज्यांना पैसे हस्तांतरित झाले आहेत, त्या सर्वांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दुसऱ्या संशयितांच्या खात्यांतूनही मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. अजूनही बऱ्याच जणांना नोटीस पाठविण्यात येणार आहेत. प्रथम अधिक रक्कम गुंतवलेल्या व्यक्तींना नोटीस पाठवल्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्वांना नोटीस पाठवून दिली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जमविलेल्या रकमेतून चित्रपट निर्मितीसह घरे, जमिनी, सोने आणि इतर मालमत्ता खरेदी केल्याचा संशय आहे. महाराष्ट्र पोलिसांकडूनही यासंदर्भातील माहिती संकलित करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणातील सर्व आर्थिक व्यवहार, भागीदार, महत्त्वाचे म्हणजे सर्वाधिक गुंतवणूकदार महाराष्ट्रातील आहेत. त्या दृष्टीने महाराष्ट्रातही चौकशी सुरू आहे. जास्त रक्कम आणून देणाऱ्या एजंटांना दहा टक्क्यांपर्यंत बोनस दिला जात होता. त्यामुळे अधिकाधिक गुंतवणूकदार या योजनेकडे आकर्षित झाल्याचा संशय आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या किंवा लाभ घेतलेल्या सर्व व्यक्तींची चौकशी केली जाणार असल्याचे डीआयजी गुळेद यांनी सांगितले.
कारवाईनंतरही पाच कोटींची गुंतवणूक
सीआयडीने शिवम असोसिएटस्ची खाती गोठविल्यानंतरही काही गुंतवणूकदारांकडून त्या खात्यांमध्ये पैसे जमा होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कारवाईनंतर ४ ते ५ कोटी रुपये शिवम असोसिएटस्च्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे लोकांनी कोणत्याही प्रकारच्या आमिषांना बळी न पडता संबंधित खात्यांमध्ये रक्कम जमा करू नये, असे आवाहन डीआयजींनी केले आहे.
‘आदित्यराज कॅपिटल’चीही चौकशी सुरू
शिवम असोसिएटस् प्रकरणासोबतच आदित्यराज कॅपिटल प्रकरणाची चौकशीही सीआयडीकडे सोपविण्यात आली आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, गुंतवणूकदारांच्या तक्रारी आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सीआयडीचे पथक आदित्यराज कॅपिटलच्या कार्यालयाला भेट देऊन प्राथमिक माहिती व कागदपत्रे ताब्यात घेणार असून बँक व्यवहार, निधीचा वापर व मालमत्तांची पडताळणी केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार संबंधित पदाधिकारी, संचालक व एजंटांची चौकशी करण्यात येणार असून तपासात अनियमितता आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.