बेळगाव

Shivam Associates Scam: शिवानंदच्या पत्नीसह नातेवाईकांना दणका

ईडीकडून छापे : बेळगाव, चिकोडी, हुक्केरी, बंगळूर, गोव्यात कारवाई

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आलेल्या शिवम असोसिएटस्‌‌ला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी (दि. ७) मोठा धक्का दिला. शिवमचा मालक शिवानंद नीलण्णावर याची पत्नी व विविध ठिकाणी असलेल्या नातेवाईकांच्या मालमत्तांवर एकाचवेळी छापे टाकण्यात आले. हे छापे बेळगाव, चिकोडी, हुक्केरी, बंगळूर व गोवा येथे घातल्याचे समजते.

बेळगावातील शिवबसवनगर येथील अपार्टमेंटमध्ये शिवानंद नीलण्णावर राहत होता. त्याचे घर, चिकोडीतील शिवम असोसिएटस्‌चे कार्यालय व कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष नंदरगी यांचे घर व हुक्केरी तालुक्यातील बडकुंद्रीतील नीलण्णावर याची पत्नी संगीता राहत असलेल्या घरावर ईडीने छापे टाकले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी शिवानंद यांची पत्नी व शिवानंद याचा मेहुणा संजू याला अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

गुंतवणुकीवर दरमहा ३ ते ५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत शिवानंद नीलण्णावरने तब्बल २,७०० कोटी रुपयांच्या ठेवी जमा केल्याचा ठपका ठेवत १५ मे रोजी त्याच्यावर माळमारुती पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी आधी केपीआयडी व त्यानंतर बडस ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला. यानंतर त्याच्या सर्व कागदपत्रांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिले. त्यांनी सर्व चौकशी करून अहवाल दिल्यानंतर हा घोटाळा कोट्यवधी रुपयांचा असल्याने प्रकरण सीआयडीकडे वर्ग केले होते.

सीआयडीने याचा सखोल तपास करत २,४०० कोटींचा घोटाळा असून ४१ हजार गुंतवणूकदारांकडून ही रक्कम गुंतवून घेतल्याचे स्पष्ट केले. शिवम असोसिएट‌स‌्‌मध्ये महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, मुंबई, सातारा, सांगली, सोलापूसह अन्य जिल्ह्यांत २० हजार गुंतवणूकदार असल्याचेही उघडकीस आले. गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवानंदला अटक झाली. त्याची बंगळूरला नेऊनही चौकशी केली. त्यानंतर त्याची येथील हिंडलगा कारागृहात रवानगी केली होती; परंतु २७ जून रोजी त्याला बंगळूरमधील विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने तो कारागृहाबाहेर आला.

आता पुन्हा चर्चा

आधी मोठमोठ्याने भाषणे ठोकणारा शिवानंद नीलण्णावर जामिनावर बाहेर आल्यानंतर गायबच आहे. जिल्हा व पोलिस प्रशासन प्रत्येकाला ठेवी मिळणार, असे सांगत असले, तरी पुढील प्रक्रिया अद्याप स्पष्ट केलेली नाही. परंतु, आता ईडीचा छापा पडल्याने शिवम असोसिएटस्‌ पुन्हा चर्चेत आले आहे. सीआयडीच्या पथकाने त्याने एकूण किती रक्कम गुंतवून घेतली आहे, त्यातील तूट किती, याचा सर्व तपशील तेव्हाच सादर केला आहे; परंतु आता ईडीच्या छाप्यात आता पुन्हा त्याच्याकडे काय सापडले, हे नंतरच समजणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT