बेळगाव : एकीकडे अद्याप सीआयडीचा तपास सुरू असताना शिवम् असोसिएट्स व शिवानंद नीलण्णावर याच्या नातेवाईकांवर चार दिवसांपूर्वी सक्तवसुली संचालनालयानेही छापे टाकले. यामध्ये कंपनीने गुंतवणूकदारांकडून २,११०.९७ कोटींची रक्कम घेतली आहे. यापैकी ३३३.८९ कोटींच्या रकमेची परतफेड केली असून उर्वरित १,७७७.०८ कोटींचा हिशोब अद्याप लागलेला नसल्याचे पत्रक सक्तवसुली संचालनालयाने प्रसिद्धीस दिले आहे.
मंगळूरमधील ईडी पथकाने ७ ऑगस्ट रोजी शिवम असोसिएट्सशी संबंधित बेळगाव, चिकोडी, हुक्केरी, बंगळूर व गोवा येथे कारवाई केली होती. बेळगावातील शिवबसवनगर येथील अपार्टमेंटमधील शिवानंद नीलण्णावर याचा फ्लॅट, चिकोडी येथील शिवम असोसिएट्सचे कार्यालय, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष नंदरगी यांचे घर व हुक्केरी तालुक्यातील बडकुंद्रीतील नीलण्णावर याची पत्नी संगीता या राहत असलेल्या घरावर ईडीने छापे टाकले. सलग तीन दिवस ईडीच्या अधिकाऱ्यांनी सर्व कागदपत्रे जप्त केली होती. याचा सर्व हिशोब लावत मंगळवारी ईडीने पत्रक त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्धीस दिले आहे.
दरमहा तीन टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत नीलण्णावर याने आतापर्यंत २,१११ कोटींची गुंतवणूक करून घेतली आहे. यातील ३३४ कोटी परत दिले असून उर्वरित २,१११ कोटी रकमेचे नेमके काय झाले आहे, याचा अद्याप तपास लागत नाही.
अनेक पुरावे जप्त
ईडीच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. शिवानंद सिद्धाप्पा नीलण्णावरने गुंतवणूकदारांकडून घेतलेली रक्कम स्वतःच्या नावे गुंतवलेली आहेच. याबरोबरच शिवम असोसिएट्स, सुभाष रामगौडा नंदरगी, महेश एस. नीलण्णावर, शिवम प्रॉडक्शन्स, शिवम लाईफलाईन प्रा. लि., शिवम सेवा प्रा. लि. येथे गुंतवणूक केली आहे. याशिवाय अनेक व्यक्ती, संस्था यांनाही मोठी रक्कम हस्तांतरित केली आहे. ईडीने जे डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. त्यामध्ये शेअर मार्केट, सावकारी ठेवी, स्टॉक ब्रोकर्समध्येही मोठी गुंतवणूक केल्याचे आढळून आले आहे.