बेळगाव : शहरातून निघणार्या शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत आबालवृद्ध सहभागी होतात. महिलांची संख्याही लक्षणीय असते. पण, डीजेच्या वापरामुळे मिरवणुकीचे स्वास्थ बिघडत चालले आहे. मद्यपींचा शिरकाव झाल्याने नृत्य करताना क्षुल्लक कारणांवरुन वादावादी होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे, लहान मुले, महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
आजकाल युवापिढीसह अगदी लहान मुलेही व्यसनाच्या आहारी जात आहेत. अशा व्यसनी युवकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत चित्ररथ मिरवणुकीशी काही देणे घेणे नसते. एखाद्या मंडळाने डीजे लावला की त्याच्या तालावर नृत्य करण्यासाठी ते अग्रभागी असतात. नृत्य करताना शुल्लक कारणांवरुन वादावादीला सुरवात होते.
हा विषय हाणामारीपर्यंत जातो. दोघांमध्ये झालेली हाणामारी दोन गटांपर्यंत पोचते. पुढे त्याचे रुपांतर दोन मंडळांतील वादात होऊन मिरवणुकीवर परिणाम होतो. त्यामुळे, पोलिसांना हस्तक्षेप करावा लागतो अन् मिरवणूक लवकर संपविण्याचा दबाब सुरु होतो.
प्रत्येक मिरवणुकीत असे होत नाही. कधीतरी एखाददुसर्या वेळेस वाद होतात. परंतु, त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागतात. त्यामुळे, डीजे लावणार्या मंडळांनी याचा नक्कीच विचार करायला हवा. आपल्या एका चुकीमुळे संपूर्ण मिरवणुकीवरच परिणाम होत असेल तर डीजे वापर टाळणेच योग्य ठरते. त्यामुळे, यंदाच्या मिरवणुकीत डीजेला फाटा द्यावा, अशी मागणी होत आहे.