बेळगाव : शिंदोळी महालक्ष्मी यात्रेला मंगळवारपासून प्रारंभ झाला असून बुधवारी रथोत्सव उत्साहात पार पडला. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गुरूवारी गावातील विविध गल्ल्यांमार्फत देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. यात्रेमुळे सध्या उत्साहाचे वातावरण असून यात्रोत्सव कमिटीच्यावतीने नेटके नियोजन करण्यात आले आहे. मांसाहारी जेवणावळीमुळे मोठी गर्दी झाली होती.
गुरुवारी सकाळपासूनच विविध गल्ल्यांमधील नागरिकांनी ओटी भरण्यासाठी रांगा लावल्या होत्या. म्हैसूर पॅलेसच्या धर्तीवर मंदिराची उभारणी करुन देवीला गदगेवर बसवण्यात आले आहे. मंदिराच्या बाहेर व आतील बाजूस स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दर्शन घेण्यासाठी येणार्या भक्तांना कोणत्याही समस्या येऊ नयेत, गर्दी होऊ नये, याची दक्षता घेतली जात आहे.
गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मारिहाळ पोलिसांच्यावतीने 30 पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. महालक्ष्मी यात्रेनिमित्त गुरुवारी मांसाहारी जेवणावळींचे आयोजन करण्यात आल्यानेे मोठी गर्दी झाली होती. गावच्या प्रवेशद्वाराजवळच पोलिसांनी दुचाकी आणि चारचाकी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे गावात रहदारीची समस्या उद्भवली नाही. रात्री शिंदोळीच्या कलाकारांकडून नाटक सादर करण्यात आले.
शुक्रवार दि.25 रोजी ग्रामस्थ व भक्तांकडून ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी आठ वाजता दुर्गादेवी व मसणाईदेवीची ओटी भरण्यात येणार आहे. सायंकाळी चार वाजता जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी शिंदोळी गावाला भेट देऊन देवीचे दर्शन घेणार आहेत. रात्री आठ वाजता जी. के. कुलकर्णी, होसळ्ळी यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.