बेळगाव : शिंदोळी महालक्ष्मी यात्रोत्सवाला मंगळवार दि. 22 पासून प्रारंभ झाला आहे. बुधवारी यात्रोत्सवाच्या मुख्य दिवशी रथोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. त्यानंतर देवी गदगेवर विराजमान झाली. कारंजी शिवानंद स्वामी आणि काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते रथाची व देवीची पूजा करून मिरवणुकीला प्रारंभ झाला.
महालक्ष्मी यात्रोत्सवानिमित्त गावात उत्साहाचे वातावरण आहे. गावातील मुख्य गल्ल्यातून महालक्ष्मीची मिरवणूक उत्साहात पार पडली. भंडार्याच्या उधळणीत लक्ष्मी मंदिरापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. ‘महालक्ष्मी देवीच्या नावानं चांगभलं’ अशा जयघोषात मिरवणूक काढण्यात आली. भंडार्याची उधळण करत भाविकांनी हलगीच्या तालावर नृत्य केले.
यावेळी मारिहाळ पोलिस स्थानकाच्यावतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रथाची उंची जास्त असल्याने हेस्कॉमच्या कर्मचार्यांनी कमी उंचीच्या वीजवाहिन्या हटविल्या होत्या. गावातील प्रमुख गल्ल्यांमध्ये स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. प्रत्येक मंडळाने रथ ओढत मिरवणुकीत सहभाग दर्शवला. बुधवारी सायंकाळी महालक्ष्मी देवी गदगेवर विराजमान झाली आहे. याठिकाणी म्हैसूर पॅलेसची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.
यात्रा कमिटीच्या वतीने संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त गावात विविध दुकाने दाखल झाली आहेत. दुकानदारांना जागा देण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी दुकाने थाटली आहेत. ग्राम पंचायत व यात्रोत्सव कमिटीच्यावतीने पिण्याच्या पाण्याची सोय, वर्दळीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, वीजपुरवठा याचे नियोजन करण्यात आले आहे.
रथोत्सवात पंचक्रोशीतील भाविक सहभागी झाले होते. मुतगा, बसरीकट्टी, निलजी, अलारवाड येथील भाविकांनी रथ ओढण्यासाठी गर्दी केली होती. गावातील मुस्लिम बांधवांनीही यात्रोत्सवात सहभागी होऊन सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला.
मिरवणूक सुरू असताना वरूणराजाचेही आगमन झाले. भाविकांनी पावसात भिजतच रथ ओढला. पावसातही भाविकांच्या उत्साहाला उधाण आले होते. हलगी व ढोलाच्या तालावर भाविक नृत्य करत मिरवणुकीत सहभागी झाले होते.
शिंदोळी महालक्ष्मी यात्रोत्सवानिमित्त दै. ‘पुढारी’च्यावतीने विशेष पुरवणी प्रसिद्ध करण्यात आली. बुधवारी सकाळी यात्रोत्सव कमिटी व पंच कमिटीच्यावतीने या पुरवणीचे प्रकाशन करून स्वागत करण्यात आले. ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश शहापूरकर, हक्कदार बाबागौडा पाटील, सुरेश पाटील यांनी या पुरवणीची कौतुक केले. शिदोळी येथील महालक्ष्मी यात्रोत्सव तब्बल पंधरा वर्षांनी साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त दै. ‘पुढारी’ने विशेष पुरवणी प्रसिद्ध केली होती. पुरवणी प्रकाशनावेळी राकेश पाटील, पिराजी अनगोळकर, बाळाराम अनगोळकर, नागेंद्र अनगोळकर लक्ष्मण मुचंडी आदींसह मान्यवर उपस्थित होते.