बेळगाव : बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिंदोळी या छोट्याशा खेड्यात सुमारे 30 टक्के धनगर समाज आहे. रोजीरोटीसाठी मेंढीपालन करुन घोंगडी बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय ते करतात. त्यांच्या या व्यवसायाला कनकदास मेंढीपालन आणि वस्त्रोद्योग सहकारी संघाची जोड मिळाल्याने घोंगडी, ब्लँकेटसारख्या उत्पादनातून त्यांनी प्रगती साधली आहे. या उत्पादनाला आता कर्नाटक-महाराष्ट्र राज्यात मोठी मागणी आहे.
धनगर समाजाच्या सहकार्याने रामलिंग अनिगोळकर यांनी कनकदास मेंढीपालन आणि वस्त्रोद्योग सहकारी संघाची स्थापना 10 मे 1967 रोजी केली. या समाजाच्या लोकांना रोजगार मिळावा हा दृष्टीकोन ठेवून या संघाची स्थापना करण्यात आली आहे. सरकारी अनुदानातून सुरूवातील गावठान जागेत शेड उभारण्यात आले.
कालांतराने या ठािकणी मोठा उद्योग सुरू झाला. मुंबई येथील कापड गिरण्यांमधील यंत्रांचा वापर करुन मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यास सुरुवात केली. यासाठी येथील धनगर समाजाने मेंढीपालनही वाढवले. मेंढ्यांच्या लोकरीपासून घोंगडी बनवण्याचा व्यवसाय वाढत गेला. सुरुवातीला फक्त शेकतरी या घोंगड्यांची खरेदी करत होते. मात्र आजच्या आधुनिक युगात अनेकांना घोंगड्यांचे महत्व समजल्याने मागणीत वाढ झाली आहे.
कर्नाटक-महाराष्ट्रातूनही चांगली मागणी आहे. या संघाला अखिल भारतीय खादी ग्रामोद्योगाची मान्यताही मिळाली आहे. कारागिरांनी बनवलेल्या घोंगड्यांवर सुवर्णसौधची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या घोंगड्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या हस्ते करण्यात आले होते. बेळगाव परिसरातील विविध संघ-संस्थांतर्फे या संघाचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे. 2015-16 मध्ये कर्नाटक राज्य पुरस्कार देऊन संघाचा बंगळूर येथे गौरव करण्यात आला आहे.