बेळगाव : शेअर मार्केटमध्ये महिना ८ टक्के नफा देण्याच्या आमिषाने बेळगाव आणि परिसरातील २३ जणांना तब्बल २ कोटी ४७ लाखांना गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी संजय गुरुपादप्पा हल्याळ (वय ५०, रा. बसवकृपा, श्रीरामनगर, शिंदोळी, ता. बेळगाव) यांनी सीईएन पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार अतुल बाबासाहेब कल्याणी (४६, कार्यालय जाधवनगर, बेळगाव, मूळ रा. करवीर कॉलनी, रुकडी, जि. कोल्हापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, अतुल कल्याणी याने बेळगावातील जाधवनगर येथील गोल्फ ग्रीन बिल्डिंगमध्ये शाईन मार्ट इंडस्ट्रीज प्रा. लि., नावाने कंपनी स्थापन केली होती. फिर्यादी संजय हल्याळ यांनी आपले भावोजी के. बी. जगदीशगौडा यांच्यामार्फत १४ मार्च २०२२ रोजी २० लाख रुपये या कंपनीत जमा केले होते. या रकमेच्या गुंतवणुकीपोटी अतुल कल्याणी याने सुरुवातीला ४ लाख ८० हजारांचा नफा दिला होता. नफा मिळतो, या आमिषाने कंपनीत अन्य २२ जणांनीही रकम गुंतवली. या सर्वांनी विविध बँकांमार्फत धनादेश तसेच रोख रक्कम दिली. २४ मार्च २०२२ ते ३१ मे २०२३ यादरम्यान सर्वांनी संबंधिताकडे तब्बल २ कोटी ४७ लाख रुपयांची गुंतवणूक केली. परंतु, यानंतर कल्याणीने या सर्वांना कसलाही ना नफा दिला, ना मूळ रक्कम परत केली. त्यामुळे संजय हल्याळ यांनी गुरुवारी याप्रकरणी सीईएन पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक बी. आर. गड्ढेकर पुढील तपास करीत आहेत.
संजय गुरुपादप्पा हल्याळ, गीता संजय हल्याळ, आदित्य संजय हल्याळ (तिघेही रा. श्रीरामनगर, शिंदोळी) शोभा शेअर बाजारचा भूलभुलैया; गमावली अडीच कोटींची माया गुरूपादप्पा हल्याळ (मूळ रा. संकेश्वर), श्रीकांत एन. अरळीकट्टी (शिंदोळी), राजाराम पाटील (देसूर), अमर रोकडे (इंडालनगर, शिंदोळी), प्रसाद एम. कुंभार (देसूर), सविता ए (टिळकवाडी), रूपाली बी. (टिळकवाडी), अभिषेक कुंभार (देसूर), शिवानंद ए. कुंभार (सावळगी, ता. गोकाक), प्रताप चौगुले (नंदीहळ्ळी), प्रसन्ना बी. (भाग्यनगर), विवेक जगदीशगौडा के. (गोवावेस बेळगाव), हरीश रेड्डी (टिळकवाडी), के. बी. जगदीशगौडा (गोवावेस बेळगाव), रवी बी. रोट्टी (गोकुळनगर, मुतगा), सावित्री बी. (टिळकवाडी), आनंद वाडकेरी (भाग्यनगर), नागराज फंदी (गोकुळनगर, मुतगा), राहुल मोटेकर (गोवावेस, बेळगाव) व राजश्री जी. हल्याळ (गोवावेस, बेळगाव) अशी फसवणूक झालेल्यांची नावे आहेत.
दिल्ली विमानतळावर तुमच्या नावे अमली पदार्थाचे पार्सल आले आहे, त्वरित हजर राहा; अन्यथा तुम्हाला अटक करू, अशी धमकी निलजी येथील सुनील पाटील यांना निनावी फोनद्वारे दिली. परंतु, त्यांनी प्रसंगावधानता दाखवल्याने त्यांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक टळली. निलजी येथील सुनील पाटील यांना शुक्रवारी निनावी फोन आला समोरच्या भामट्याने आपल्या नावे पार्सल आले असून, यामध्ये १६ नकली पासपोर्ट, ५८ एटीएम कार्ड व १४० ग्रॅम एमडीएम नावाचा अमली पदार्थ सापडला आहे. हे पार्सल मलेशियाला जाणार होते. परंतु, ते तुमच्या नावे असल्याने व यामध्ये आक्षेपार्ह वस्तू सापडल्याने तुमच्यावर गुन्हा दाखल होणार आहे. तुम्ही त्वरित दक्षिण दिल्ली पोलिस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार दाखल करा व यातून स्वतःची सुटका करून घ्या, असे समोरील बोलत होता. दिल्ली पोलीस ठाणे म्हणून त्याने एकाशी फोन जोडून दिला. तो व्यक्तीही आपण कस्टम अधिकारी सुमित मिश्रा असून तुम्हाला अटक करून दिल्ली न्यायालयात हजर करावे लागेल, असे सांगू लागला. सुरवातीला घाबरलेले सुनील पाटील यांनी मला दिल्लीला येता येणार नाही. तेव्हा भामट्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे तुमची तक्रार नोंदवा तसेच ओळखपत्र पाठवा, असे सांगितले. यावेळी पाटील यांनी ओळखपत्र पाठवण्यास नकार दिला. तेव्हा समोरचे भामटे अधिकच तणतण करू लागले. हा सर्व प्रकार फसवणुकीचा असल्याचे लक्षात येताच पाटील यांनी फोन बंद केला. त्यांनी दाखवलेली तत्परता व प्रसंगावधानतेमुळे त्यांची फसवणूक टळली. अशाप्रकारे कोणाला धमकीचा फोन आल्यास त्यांनीही अशी सजगता दाखवण्याची गरज व्यक्त होत आहे.