बेळगाव : देशात संस्थाने निर्माण झाली ती संस्थाने विविध नावांनी ओळखली गेली; मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वत्र सत्ता असतानाही त्यांनी कधीच भोसले नावाचे संस्थान निर्माण केले नाही. संपूर्ण राज्य रयतेचे असल्याचे सांगत त्यांनी जनतेसमोर आपला आदर्श ठेवला होता. त्यांचा आदर्श आम्ही सार्यांनीच घेतला पाहिजे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.
येळ्ळूर येथील सरकारी मराठी मॉडेल शाळेचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव कार्यक्रम शनिवार, दि. 26 रोजी येथील सैनिक भवन येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष माजी खासदार डॉ. प्रभाकर कोरे, खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, माजी आमदार महांतेश कवठगीमठ, माजी आमदार अरविंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीत सादर करण्यात आले. एन. डी. गोरे यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मुख्याध्यापक राजेंद्रकुमार चलवादी यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला.
शरद पवार म्हणाले, स्वातंत्र्यापूर्वी येळ्ळूर येथे या मराठी शाळेची स्थापना झाली. आज या शाळेला दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. या शाळेतून अनेक कर्तृत्वान विद्यार्थी घडले आहे. त्यांनी या गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर अशी यशस्वी वाटचाल होऊ शकते असे सांगत त्यांनी येळ्ळूरवासियांचे कौतुक केले.
अहो, गुरुजी अशी हाक मारली तर येळळूर गावातील अनेक घरामधून शिक्षक घराबाहेर येतात. कारण प्रत्येक घरामध्ये एक शिक्षक असलेल्या येळ्ळूर गावाला एक वेगळा इतिहास आहे. प्रत्येक घरामध्ये शिक्षक असणे हीदेखील उल्लेखनीय बाब आहे. महात्मा जोतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच प्रत्येकाच्या घरापर्यंत शिक्षण पोहचले आहे. शिक्षणामुळेच आज आपण विविध क्षेत्रात प्रगती केली असल्याचे शरद पवार म्हणाले.