बेळगाव : कर्नाटकात 52,950 कोटी रुपयांची रेल्वेची कामे प्रगतिपथावर आहेत. त्यात नवीन रेल्वेमार्ग उभारणी, स्थानकांचा सर्वसमावेशक पुनर्विकास आणि मोठ्या सुरक्षा सुधारणा यांचा समावेश आहे. येत्या काळात बंगळूर-पुणे, बंगळूर- हैदराबाद व बंगळूर-चेन्नई मार्गावर सात नवीन रेल्वे धावणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी दिली. ते शनिवारी (दि. 7) एका खासगी हॉटेलात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठी केलेल्या तरतुदींबाबत त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले, राज्यातील रेल्वे विकासासाठी 2026-27 मध्ये 7,748 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अमृत स्टेशन योजनेंतर्गत आधुनिक व जागतिक दर्जाच्या स्थानक सुविधांद्वारे प्रवाशांना अधिक चांगला अनुभव मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. कर्नाटकातील एकूण 61 स्थानकांचा 2,110 कोटी रुपये निधीतून पुनर्विकास केला जात आहे. बागलकोट, धारवाड, गदग, गोकाक, मुनिराबाद या पाच स्थानकांच्या पुनर्विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. सध्या राज्यात 12 वंदे भारत एक्सप्रेस आणि तीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्या धावत आहेत. परिणामी प्रवासाचा वेग, आराम आणि कार्यक्षमता सुधारली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
राज्यात सुमारे 1,750 किमी लांबीचे नवीन रेल्वे मार्ग बांधले आहेत. 97 टक्के म्हणजेच 3,368 किमी रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण झाले आहे. रस्ते-रेल्वे जोडणी अधिक सुरळीत करण्यासाठी 707 उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग बांधण्यात आले आहेत. बेळगाव ते धारवाड या 73 कि. मी. लांबीच्या लोहमार्गाला चालना दिली आहे. अनगोळात चौथ्या रेल्वे फाटकावर 35 कोटी खर्च करुन भुयारी मार्ग बनवण्याचे काम सुरु आहे, असे मंत्री सोमण्णांनी स्पष्ट केले. याप्रसंगी माजी आमदार महांतेश कवटगीमठ, संजय पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, शहराध्यक्षा गीता सुतार, ॲड. एम. बी. जिरली, खासदार इराण्णा कडाडी, डॉ. रवी पाटील, माजी आमदार अरविंद पाटील व इतर भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.