बेळगाव

विजापूर : मक्याची पोती कोसळून सात कामगार मृत्युमुखी

दिनेश चोरगे

विजापूर; पुढारी वृत्तसेवा : शहराजवळील अलीयाबाद येथील औद्योगिक वसाहतीतील एका गोदामात मक्याची पोती कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात कामगार मृत्युमुखी पडले. ही घटना राजगुरू इंडस्ट्रीजच्या गोदामात घडली असून, काही कामगार जखमी झाले आहेत. ही घटना राजगुरू फूड प्रोसेसिंग युनिटमध्ये घडली. येथे साठवलेल्या मक्याच्या पोत्यांवर मोठे यंत्र पडले. त्यामुळे पोती कोसळल्याने तेथे काम करणारे बिहारचे मजूर त्याखाली अडकले होते. यामध्ये सात कामगार मृत्युमुखी पडले, शवविच्छेदन केल्यानंतर सर्व मृतदेह विमानाने त्यांच्या गावी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

कृष्ण किसनकुमार (वय 26), राजेशकुमार मुकिया (वय 26), संबू मुकिया (वय 43), लुको यादव (वय 42), रामब्रीद्र मुकिया (वय 45), रामबालाक मुकिया (वय 43), दुल्हारा चंद मुकिया (वय 58) अशी मृतांची नावे आहेत. सोनू करमचंद, रविशकुमार, अनिल, कळमेश्वर मुकिया, किशोर हंजरीमल जैन, प्रकाश भडकल हे या घटनेत जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारच्या वतीने प्रत्येकी सात लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे जिल्हा पालकमंत्री एम. बी. पाटील यांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून या मका प्रक्रिया प्रकल्पात विविध ठिकाणचे कामगार काम करत आहेत. सोमवारी सायंकाळी अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्वांची तारांबळ उडाला. चार जेसीबीच्या सहाय्याने मका बाजूला करून कामगारांना वाचविण्याचे काम सुरू करण्यात आले होत. मंगळवार दुपारपर्यंत हे बचावकार्य सुरू होते. घटनेची माहिती मिळताच एसपी ऋषिकेश सोनावन आणि पोलिस कर्मचार्‍यांनी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले. अग्निशमन दलाच्या जवानांनीही मदत केली. सहा कामगारांना वाचवण्यात आले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

देवानेच मला वाचवले….

या घटनेतून बचावलेेले रंजमुतिया यांना आपला अनुभव सांगताना अश्रू अनावर झाले. प्रोसेसिंग युनिटमध्ये कामगार काम करत असताना अचानक पोत्याचा आणि मक्याचा ढीग माझ्या अंगावर पडला. मला काय करावे कळत नव्हते. हातपाय हलवता येत नव्हते. बाहेर थांबलेल्या कामगारांना मला वाचवले. पायाला आणि कंबरेला दुखापत झाली आहे. देवानेच मला वाचवले, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा पालकमंत्री एम. बी. पाटील यांची घटनास्थळी धाव

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना सात लाख रुपये भरपाई देण्यात येईल, असे जिल्हा पालकमंत्री एम. बी. पाटील यांनी सांगितले. सोमवारी सायंकाळी झालेल्या दुर्घटनेची माहिती समजताच बेळगाव येथील विधिमंडळ अधिवेशनात असलेल्या मंत्र्यांनी रात्री उशिरा विजापूरला धाव घेतली. घटनास्थळी जाऊन मध्यरात्रीपर्यंत बचाव कार्याची पाहणी केली. तसेच जिल्हाधिकारी टी. भुबलन, एसपी ऋषिकेश सोनावन, जिल्हा परिषद सीईओ राहुल शिंदे यांच्याकडून बचाव कार्याची माहिती घेतली.
यावेळी कामगारांशी बोलताना मंत्री पाटील यांनी या घटनेची सखोल चौकशी केली जाईल.शिवाय राजगुरू इंडस्ट्रीजच्या मालकांकडून योग्य नुकसानभरपाई मिळवून देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. जिल्हा पालक मंत्री या नात्याने कामगारांना शासनाकडून सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

भरपाई मिळवून देऊ : मंत्री लाड

विजापूर येथे घडलेली घटना दुर्दैवी असून, सर्व मजूर बिहार राज्यातील आहेत. माणसुकीच्या नात्याने भरपाई देण्याचे कार्य करत असल्याचे कामगार खात्याचे मंत्री संतोष लाड यांनी सांगितले. मृत मजुरांच्या कुटुंबीयांना भरपाई मिळवून देऊ, असे सांगितले.

SCROLL FOR NEXT