बेळगाव : सौंदत्ती यल्लम्मा देवीचे दर्शन घेऊन बेळगावला परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा टायर फुटून रस्त्यावरच उलटल्यानेे 7 जण जखमी झाले. हलगा गावाजवळ शनिवार दि. 10 रोजी रात्री हा अपघात झाला. जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातात जखमी झालेले सर्वजण चव्हाट गल्ली येथील आहेत. देवीचे दर्शन आटोपून बेळगावला ते परतत होते. या वाहनामध्ये 12 भाविक होते. त्यामधील सातजण जखमी झाले आहेत. जखमींच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असून काहीजणांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. महामार्गावर घडलेल्या या अपघाताची माहिती हिरेबागेवाडीचे पोलिस निरीक्षक एस. के. होळेण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली.