Laxman Savadi | शह-काटशहाच्या राजकारणात सवदींचा उदय 
बेळगाव

Laxman Savadi | शह-काटशहाच्या राजकारणात सवदींचा उदय

राजकीय समतोलाचा प्रयत्न : जारकिहोळी बंधूंना आवरण्याचीही खेळी

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : जिल्ह्यातील काँग्रेस अंतर्गत शह-काटशहाच्या राजकारणात लक्ष्मण सवदी यांचा राजकीय उदय झाला आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी राजकीय समतोल राखण्यासाठी आणि जारकिहोळी बंधूंच्या वारुला लगाम घालण्यासाठी सवदी यांना मंत्रिपद देऊन एक मोठी खेळी खेळली आहे. त्यामुळे, आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय आघाडीवर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

बेळगाव जिल्हा राज्यात सर्वात मोठा असल्यामुळे अधिक मंत्रिपदे मिळावीत, अशी अपेक्षा काँग्रेसच्या आमदारांत होती. अकरापैकी सहा आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. पण, शिवकुमार यांनी अनेकांना चकवा देत सवदी यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घातली आहे. लक्ष्मण सवदी हे उत्तर कर्नाटकातील सहकार आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या नेत्यांपैकी एक आहेत. १९९९ मध्ये त्यांनी निवडणूक राजकारणात प्रवेश केला. तत्पूर्वीच त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून दोन कार्यकाळ पूर्ण केले होते. २००४ मध्ये त्यांना भाजपचे तिकीट मिळाले आणि त्यांनी अनुभवी राजकारणी शहाजहाँन डोंगरगाव यांचा पराभव केला. गेल्या २२ वर्षांत त्यांनी चार विधानसभा निवडणुका आणि एक विधान परिषद निवडणूक जिंकली आहे.

अथणीच्या या आमदाराची मंत्रिमंडळातील वर्णी लागण्यामागे केवळ सहकार क्षेत्रातील किंवा निवडणूक राजकारणातील त्यांचा अनुभव हे कारण नाही. मुख्यमंत्री शिवकुमार यांच्याशी असलेली त्यांची जवळीक त्यांच्या पथ्यावर पडली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या काळात लिंगायत नेते लक्ष्मी हेब्बाळकर, अशोक पट्टण आणि गणेश हुक्केरी यांचे दावे तितकेच प्रबळ होते. पण, त्यातूनही सवदी यांनी बाजी मारली. मुख्यमंत्री शिवकुमार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यातील कथित दुरावा, तसेच या भागात पर्यायी नेतृत्व पुढे आणण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छा, यामुळेही सवदी यांना मंत्रिपद मिळाले आहे. सवदी यांचे जारकिहोळी घराण्याचे संबंध फारसे सलोख्याचे नाहीत.

२०२५ मधील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सर्व जारकिहोळी बंधूंनी सवदी यांच्या उमेदवारांच्या पॅनेलचा पराभव करण्यासाठी भाजप नेते अण्णासाहेब जोल्ले यांच्याशी युती केली होती. भाजपचे आमदार रमेश जारकिहोळी यांनी जाहीर सभांमध्ये सवदी यांच्याबद्दल अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. त्यामुळेच जारकिहोळी बंधूंना टक्कर देण्यासाठी सवदी यांनी भाजप नेते आणि माजी खासदार रमेश कत्ती यांच्याशी हातमिळवणी होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT