बेळगाव : दगड खाणीतील दगड जेसीबीद्वारे फोडणे व भरण्याचे काम सुरु असताना जेसीबी बकेटचा वीजवाहिनीला स्पर्श झाला. जेसीबीत वीजप्रवाह उतरल्याने दोघांनी पाण्यात उडी मारली. परंतु, तेथेही वीजप्रवाह असल्याने जोराचा झटका बसून दोघांचा मृत्यू झाला. सौंदत्ती तालुक्यातील नविलुतिर्थ जलाशयाजवळ मंगळवारी (दि. 21) सायंकाळी घडली. रवीकुमार सिंग (वय 18) व सुभाष सिंग (वय 18) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, नविलुतिर्थ जलाशयाजवळ कल्याण शेट्टी असोसिएशनच्यावतीने दगड फोडण्याचे काम सुरु होते. येथे मोठ्या दगडखाणी असून काम जोरात चालते. मंगळवारी येथे दगड फोडण्याचे व ते भरण्याचे काम सुरु होते. जेसीबीमध्ये उपरोक्त दोघेजण बसून व ते पाण्यात उभा करुन दगड भरणे सुरू होते. त्याच्या वरील बाजूने 11 केव्हीची वीजवाहिनी गेली होती. हे जेसीबीचालकाच्या लक्षात आले नाही. त्याने नेहमीसारखे जेसीबीचे तोंड वर केल्यानंतर त्याच्या बकेटचा वीजवाहिनीला स्पर्श झाला. त्यामुळे, वीजप्रवाह जेसीबीत उतरला.
दोघांनीही तत्परता दाखवत पाण्यात उडी मारली. परंतु, पाण्यातही वीजप्रवाह उतरल्याने त्यांना जोराचा शॉक लागून दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर खाण कंत्राटदाराने पोलिसांना माहिती देण्यास विलंब केल्याने रात्री उशिरापर्यंत याची नोंद झाली नव्हती. त्याने फिर्यादीसाठी उशिर केल्याने पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. सौंदत्ती पोलिसांनी याची दखल घेतली असून पुढील तपास सुरू आहे.