बेळगाव ः संतीबस्तवाडमधील (ता. बेळगाव) वातावरण गेल्या तीन महिन्यांपासून दूषित बनले आहे. चार दिवसांपूर्वी येथे झालेल्या धर्मग्रंथाची विटंबना प्रकरणाचा शोध घेताना महिन्यापूर्वीचे दुसरेच प्रकरण उघडकीस आले आहे. एप्रिलमध्ये गावातील इदगाह मैदानातील घुमट व काही थडग्यांवरील फरशा फोडल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी गुरुवारी (दि. 15) रात्री पत्रकार परिषदेत दिली.
अटक केलेल्या संशयितांमध्ये लक्ष्मण यल्लाप्पा उचवाडे (30), मुताप्पा भरमा उचवाडे (वय 26), लक्ष्मण नागाप्पा नाईक (वय 30) व शिवराज यल्लाप्पा गुदली (वय 29, चौघेही रा. संतीबस्तवाड) यांचा समावेश आहे.
चार दिवसांपूर्वी संतीबस्तवाडमधील प्रार्थनास्थळातून धर्मग्रंथ बाहेर नेऊन त्याची विटंबना झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मुस्लिम बांधवांनी चन्नम्मा सर्कलमध्ये धरणे धरत निषेध केला. यावेळी पोलिस आयुक्तांनी तीन दिवसांत संशयितांना अटक करु, असे आश्वासन दिले.
विटंबना प्रकरणी पोलिसांनी पाच पथके तयार करुन रात्रंदिवस तपास सुरु केला. या तपासात धर्मग्रंथ विटंबना प्रकरणातील कुणीही सापडले नाही. परंतु, 14 एप्रिल रोजी सायंकाळी 8 ते 15 रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास गावातील इदगाह मैदानातील चार घुमट पाडल्याचे आढळून आले. शिवाय काही महत्वाच्या थडग्यावरील नावांच्या फरशांची नासधूस केल्याचेही दिसून आले. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून महिनाभर सुरु आहे. परंतु, धर्मग्रंथ विटंबना प्रकरणाचा शोध घेताना त्यातील चौघे संशयित सापडले, असे त्यांनी सांगितले.
आमदार राजू सेट म्हणाले, धर्मग्रंथाची विटंबना ही चुकीची बाब आहे. या प्रकरणात पोलिसांकडून योग्य तपास सुरु आहे. त्यांना आपला संपूर्ण पाठिंंबा आहे. त्यांनी समाजकंटकांचा लवकर शोध घेऊन हे प्रकरण तडीस न्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
धर्मग्रंथ विटंबना प्रकरणातील संशयित अद्याप सापडले नसल्याने मुस्लिम बांधवांनी पुन्हा आंदोलनाची तयारी सुरु केली आहे. या प्रकरणी शुक्रवारी पुन्हा मोर्चा काढणार असल्याचे सांगितले आहे. पत्रकार परिषदेत याबाबत विरोधाभास दिसून आला. शुक्रवारच्या आंदोलनाला पोलिसांची परवानगी असल्याचे आयुक्त मार्बन्यांग यांनी सांगितले. परंतु, शांततेच्या मार्गाने आंदोलन करणे हा लोकशाहीचा अधिकार आहे. त्यामुळे, पंच मंडळींशी चर्चा करुन आंदोलनाचा निर्णय घेतला जाईल, असे आमदार सेट यांनी सांगितल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
धर्मग्रंथ विटंबना प्रकरणाच्या तपासाबाबत गुरुवारी (दि. 15) सायंकाळी संतीबस्तवाडमध्ये बैठक झाली. या बैठकीला गावातील पंचमंडळी, मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिक व पोलिस आयुक्त मार्बन्यांग उपस्थित होते. प्रकरणाचा तपास सखोल सुरु असून लवकरच समाजकंटकांचा शोध घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मात्र, तीन दिवसांनंतरही त्यांचा शोध घेतला नसल्याने शुक्रवारी आंदोलन करणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.