संकेश्वर : हिरण्यकेशी नदीत पोहायला गेलेल्या मुलाला वाचविताना आईसह मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. लक्ष्मी सुधाकर कुटोळी (वय 27) व सुप्रित कुटोळी (वय 9) अशी मृतांची नावे आहेत.
येथील हनुमाननगरातील लक्ष्मी कुटोळी व सुप्रित कुटोळी हे दोघे येथील शंकरलिंग मठात देवदर्शनासाठी गेले होते. त्यानंतर सुप्रित मंदिराजवळील हिरण्यकेशी नदीकाठी गेला. तो अचानक पाण्यात पडल्याने त्याला वाचविण्यासाठी आई लक्ष्मी नदीत उतरली; पण तिला पोहता येत नसल्याने दोघेही बुडाले.
या घटनेत लक्ष्मी कुटोळी यांचा मृतदेह सापडला असून, अग्निशमन दलाकडून सुप्रितचा शोध सुरू आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक शिवशरण आवजी व उमेश शेट्टण्णावर यांनी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरा लक्ष्मी कुटोळी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद संकेश्वर पोलिस ठाण्यात झाली आहे.