संकेश्वर : यमकनमर्डी (ता. हुक्केरी) येथील बाजारपेठेतील घर फोडून चोरट्यांनी 128 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चांदीचे दागिने व रोकड लंपास केली. अजित दुगाणी यांच्या घरात दिवाळी दिवशीच घरफोडी करण्यात आली.
दुगाणी हे कामानिमित्त बाहेर गेले असता चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यांनी तिजोरी व लॉकरमध्ये असलेले 128 तोळे सोने अंदाजे किंमत 89.60 लाख रुपये, 8.50 किलो चांदी अंदाजे किंमत 5.95 लाख रुपये व 1 लाख 25 हजार रुपये असा एकूण 96 लाख 80 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस प्रमुख भीमाशंकर गुळेद, गोकाक डीएसपी रवी नाईक, पोलिस, श्र्वान पथक व ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी पाहणी केली. या घटनेची नोंद यमकनमर्डी पोलिस ठाण्यात झाली आहे. यमकनमर्डी परिसरात गेल्या काही दिवसांत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी गस्त ठेवण्याची मागणी होत आहे.