बेळगाव

Sankeshwar water issue: पाणी प्रश्नाबाबत शेतकऱ्यांतर्फे संकेश्वर बंद

हुक्केरी तालुक्यातील पाणी प्रश्न तीव्र झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांतर्फे संकेश्वर बंदची हाक देण्यात आली

पुढारी वृत्तसेवा

संकेश्वर : हुक्केरी तालुक्यातील पाणी प्रश्न तीव्र झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांतर्फे संकेश्वर बंदची हाक देण्यात आली. अचानक पुकारलेल्या या बंदमुळे व्यापारीवर्गाची मोठी तारांबळ उडाली असून शहरातील बहुतांश दुकाने बंद ठेवण्यात आली.

तालुक्यात हिडकल धरण व शिरूर हे दोन मोठे पाटबंधारे प्रकल्प असतानाही राजकीय दुर्लक्षामुळे तालुक्याला पुरेसे पाणी मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या मागणीसाठी गेल्या 4 दिवसांपासून हुक्केरी शहरात आंदोलन सुरू असून त्याला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी संकेश्वर बंद पाळण्यात आला.

तालुक्यातील हिडकल धरणातील पाणी बेळगाव शहरासह बागलकोट, विजापूर भागाला पुरवले जाते. सध्या धारवाड येथील औद्योगिक वसाहतीलाही या प्रकल्पातून पाणी उचलले जात आहे. पण हुक्केरी तालुक्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे सरकार व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याने तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांना फटका बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

शेतकरी संघटनांतर्फे तालुका बंदचे आवाहन करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या या आंदोलनात हुक्केरी तालुक्यासह परिसरातील शेतकरी सहभागी झाले आहेत. आ. निखील कत्ती यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. संबंधित पाटबंधारे अधिकारी आणि मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी घटनास्थळी येऊन प्रश्नाचा तोडगा काढावा, या मागणीवर शेतकरी ठाम राहिल्याने वातावरण अधिक चिघळले आहे. अचानक पुकारलेल्या बंदमुळे व्यापारीवर्गाची काहीशी गैरसोय झाली असली तरी पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT