Sanjay Raut Pudhari File Photo
बेळगाव

Sanjay Raut: समन्वयकमंत्री सीमावासीयांच्या वेदना जाणून घेणार का?

शिवसेना नेते संजय राऊत यांचा महाराष्ट्र सरकारला सवाल

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचा खटला गेली २० वर्षे सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. सीमाभागातील मराठी जनतेवर अन्याय होत आहे. अशावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एकदा तरी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना, 'सीमाखटला न्यायप्रविष्ट असून सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय करु नका, ' असे ठणकावून सांगितले आहे का? त्यांच्या वेदना जाणून घेतल्या आहेत का? असा सडेतोड सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे नेते संजय राऊत यांनी नुकताच मुंबईत पत्रकारांशी बोलताना केला.

ते म्हणाले, सीमाभागासाठी नेमलेले समन्वयकमंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी बेळगावात जाऊन तेथील मराठी भाषकांच्या व्यथा-वेदना कधी जाणून घेतल्यात का? महाराष्ट्रात आज संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी संबंधित नसलेली माणसे सत्तेवर आहेत. बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र अपूर्ण असल्याचा उल्लेख महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एकदा तरी केला आहे का?, मी सुद्धा त्याच भागातील मराठी जनतेचा मुख्यमंत्री आहे, ' अशी संवेदना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कधी झाली आहे का? याचे त्यांनी आत्मचिंतन करावे, असा टोला त्यांनी हाणला.

सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकदा तरी सीमाभागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाचा उल्लेख केला आहे का? सीमाभागातील मराठी भाषिक जनतेच्या व्यथा-वेदना जाणून घेण्यासाठी नेमलेले समन्वयकमंत्री बेळगावला कधी गेले आहेत का, ते सांगावे. सध्या जी शिवसेना म्हणून सत्तेत आहेत, ती तरी कधी बेळगाव सीमाभागातील मराठी भाषिक जनतेवर होत असलेल्या अन्यायाबाबत बोलली आहे का? असे प्रश्न उपस्थित करुन पुन्हा एकदा सीमाप्रश्नाबाबत सद्या कार्यरत असलेल्या महाराष्ट्र सरकारला जाब विचारला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT