खानापूर : सांबराची (हरिण) शिकार केल्याप्रकरणी वनखात्याच्या पथकाने छापा टाकून नेरसेतील (ता. खानापूर) नऊजणांना अटक केली. गुरुवारी (दि. 26) रात्री ही कारवाई करण्यात आली.
रणजीत जयसिंग देसाई, बळवंत नारायण देसाई, आत्माराम यल्लाप्पा देवळी, प्रमोद नामदेव देसाई, दत्तराज विलास हवालदार, ज्ञानेश मंगेश गावडे, गोविंद रामचंद्र देसाई, अप्पी इंगाप्पा हणबर, बराप्पा बाबू हणबर (सर्वजण रा. नेरसे ता. खानापूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या सर्वांना शुक्रवारी (दि. 27) न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
याबाबत वनखात्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी, लोंढा वन परिक्षेत्राच्या अखत्यारीतील नेरसे विभागात काहींनी सांबराची शिकार केल्याची माहिती सायंकाळी पाचच्या सुमारास वनाधिकार्यांना मिळाली. त्यानुसार नेरसेतील सर्व्हे. क्र. 102 च्या बाजूला असलेल्या मालकी सर्व्हे. क्र. 104/2 मध्ये संशयितांनी सांबराची शिकार केल्याचे आढळून आले. यासंबंधी वन्यजीव संरक्षण कायदा 1972 कलम 9, 39, 44, 50, 51 नुसार लोंढा वनक्षेत्रपाल कार्यालयात गुन्हा दाखल करुन संबंधितांना अटक करण्यात आली. बेळगावचे मुख्य वनसंरक्षक मंजुनाथ चव्हाण, उपवनसंरक्षक मारिया ख्रिस्तू राजा, खानापूरच्या एसीएफ सुनीता निंबरगी, आरएफओ श्रीकांत पाटील, सय्यदसाब नदाफ, वाय. एस. पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.