बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीला शुक्रवारी (दि. १०) बेळगावात प्रारंभ झाला. संत मीरा शाळेच्या आवारात आयोजित बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह सरकार्यवाह दतात्रेय होसबाळे उपस्थित होते.
बेळगावात तीन दिवसीय प्रांत प्रचारक वार्षिक बैठकीचे आयोजन प्रथमच करण्यात आले आहे. याची सुरुवात शुक्रवारी करण्यात आली. रविवारपर्यंत (दि. १२) कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, सह सरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाळ, सी. आर. मुकुंद, अरुण कुमार, रामदत्त, अशोक कुमार, अतुल लिमये आदीसह अखिल भारतीय कार्य विभागाचे प्रमुख व सह-प्रमुख, कार्यकारिणी सदस्य, क्षेत्र प्रचारक, सह-क्षेत्र प्रचारक तसेच सर्व ४६ प्रांतांचे प्रांत प्रचारक, सह-प्रचारक आणि संघप्रेरित विविध संघटनांचे अखिल भारतीय संघटन मंत्री बैठकीला उपस्थित होते.
बैठकीत प्रामुख्याने मार्च २०२६ नंतर संघाच्या विविध स्तरांवर पार पडलेल्या प्रशिक्षण वर्गांचा आढावा घेण्यात आला. शाखा स्तरावरील कार्ययोजनेच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संघ शताब्दीनिमित्त झालेल्या शाखा कार्य विस्ताराचा आढावा आणि आगामी जास्तीत जास्त शाखा विस्ताराच्या योजनेवर चर्चा, शताब्दी वर्षातील पार पडलेल्या कार्यक्रमांचा आढावा आणि उर्वरित नियोजित कार्यक्रमांची आखणी, सरसंघचालकांच्या २०२६-२७ मधील प्रवास योजनेवर चर्चा करण्यात आल्याचे समजते.
कडेकोट बंदोबस्त
बैठकीच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामुळे परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. परिसरात ३५० हून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सुरक्षेच्या कारणास्तव कार्यक्रम परिसरात ड्रोन उडवण्यास तसेच माध्यम प्रतिनिधी आणि सर्वसामान्य लोकांना प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.