Mohan Bhagwat  Pudhari File Photo
बेळगाव

Mohan Bhagwat: सरसंघचालक डॉ. भागवत आठ दिवस बेळगावात

सोमवारी होणार आगमन : रा. स्व. संघाच्या प्रांत प्रचारक बैठकीचे आयोजन

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक बेळगावात होणार आहे. या बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह संघाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. डॉ. भागवत हे सोमवारी (दि. ६) बेळगावात दाखल होणार असून त्यांचा आठ दिवस मुक्काम असणार आहे.

संघाच्या विविध स्तरांवरील स्वयंसेवकांच्या बैठकींना सोमवारपासून प्रारंभ होणार आहे. त्यानंतर १०, ११ आणि १२ जुलै रोजी अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक पार पडणार आहे. या बैठकीत देशभरातील प्रांत प्रचारक, सहप्रांत प्रचारक, क्षेत्र प्रचारक तसेच सहक्षेत्र प्रचारक सहभागी होणार आहेत. संघटनात्मक रचनेनुसार देशातील ११ क्षेत्रे आणि ४६ प्रांतांतील कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित राहतील. तसेच संघ प्रेरित ३२ विविध संस्थांचे अखिल भारतीय संघटन मंत्रीदेखील सहभागी होणार आहेत.

मार्चमध्ये हरियाणातील समालखा येथे झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेनंतर एप्रिल, मे आणि जून महिन्यांत देशभरात विविध स्तरांवरील संघ शिक्षण वर्ग यशस्वीरीत्या पार पडले. या पार्श्वभूमीवर शाखास्तरावरील वार्षिक कार्ययोजनेच्या अंमलबजावणीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देशभरात शाखाविस्तारासाठी राबविलेल्या उपक्रमांचा आढावा घेऊन भविष्यात शाखांची संख्या वाढविण्यासंदर्भातही सविस्तर चर्चा होणार आहे.

याशिवाय २०२६ मधील संघ शिक्षण वर्गांचे मूल्यमापन, शताब्दी वर्षात पूर्ण झालेल्या कार्यक्रमांचा आढावा, उर्वरित कार्यक्रमांचे नियोजन तसेच सरसंघचालक डॉ. भागवत यांच्या २०२६-२७ या वर्षातील प्रवास आराखड्यावरही विचारविनिमय होणार आहे. बैठकीला सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, सहसरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल, सी. आर. मुकुंद, अरुणकुमार, रामदत्त, आलोक कुमार, अतुल लिमये, अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर, अखिल भारतीय कार्य विभागप्रमुख आणि अखिल भारतीय कार्यकारी मंडळाचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT