बेळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ६ जुलैपासून पुढचे आठ दिवस बेळगाव दौऱ्यावर आहेत. या काळात ते बेळगावमध्ये विश्व हिंदू परिषदेसह संघ परिवाराच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे बेळगाव परिसर नो फ्लाय झोन घोषित करण्यात आला आहे.
भागवत यांचे बेळगावात ६ ते १४ जुलै या काळात वास्तव्य असेल. भागवत अनगोळ औद्योगिक वसाहत, उद्यमबाग, संत मीरा हायस्कूल, सह्याद्री कॉलनी, भाग्यनगर एक्स्टेन्शन, जगन्नाथराव जोशी स्मारक भवन, गुरुदत्त रोड, शास्त्रीनगर, खडेबाजार आदी ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांनाही ते उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या बेळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सुरक्षा उपाययोजना राबवल्या आहेत. त्यांच्या वास्तव्यासह विविध कार्यक्रमस्थळांच्या दोन कि.मी. परिसरात नो फ्लाय झोन घोषित करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले असून सरसंघचालकांचा दौरा संपेपर्यंत ही बंदी प्रभावी राहणार आहे. संपूर्ण दौऱ्याच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस यंत्रणेवर सोपविण्यात आली असून, शहरातील संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.