बंगळूर : सरकारी शाळा, क्रीडांगणे, स्टेडियम आणि इतर शासकीय ठिकाणी उपक्रम राबविण्यावर राज्य सरकारने अंकुश लावल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराने आता शक्तीप्रदर्शनाची योजना आखली आहे. गुलबर्गा जिल्ह्यात रविवारी (दि. 19) कोणत्याही परवानगीशिवाय आम्ही एकत्र येऊन ताकद दाखविणार असल्याची भूमिका संघप्रमुखांनी घेतली आहे.
राज्य सरकारने काही निर्बंध लादल्यानंतर संघाची ताकद दाखविण्यासाठी रविवारी मंत्री प्रियांक खर्गेंचा मतदारसंघ असलेल्या चित्तापूरमध्ये (जि. गुलबर्गा) हजारो स्वयंसेवक एकत्र येणार आहेत. खासदार नारायण बंडगे यांच्या नेतृत्वाखाली मिरवणुकीची आवश्यक तयारी सुरु आहे. हजारो कार्यकर्त्यांना स्वेच्छेने मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सरकारी जमिनीवर कोणत्याही संघटनांना उपक्रम राबविण्यासाठी परवानगी आवश्यक असल्याचा सरकारचा निर्णय झाल्यानंतर राज्यातील ही पहिलीच मिरवणूक काढण्यात येत आहे. याकडे शक्तीप्रदर्शन म्हणून पाहिले जात आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.
चित्तापूरच्या प्रमुख ठिकाणी एक तासापेक्षा जास्त काळ मिरवणूक काढण्याचे नियोजन आहे. आम्ही कोणतीही परवानगी न घेता मिरवणूक काढू. आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांकडून परवानगी घेणार नाही, भूतकाळातही नाही आणि भविष्यातही नाही, असा पवित्रा संघ परिवाराने घेतल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.