Vitthal Halgekar: वाळूपुरवठा सुरळीत करा, वन्यप्राण्यांना आवरा Pudhari
बेळगाव

Vitthal Halgekar: वाळूपुरवठा सुरळीत करा, वन्यप्राण्यांना आवरा

आमदार विठ्ठल हलगेकर : खानापुरात अडीच वर्षांनंतर केडीपी बैठक

पुढारी वृत्तसेवा

खानापूर : गेल्या तीन वर्षांपासून सुरळीतपणे सुरु असलेला वाळू उपसा व पुरवठा अचानक बंद करण्यात आल्याने शेकडो कुटुंबांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. वीट उत्पादनावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे, वाळूपुरवठा तातडीने सुरळीत करण्यासह वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी पावले उचलावीत, अशा सूचना आमदार विठ्ठल हलगेकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

अडीच वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर गुरुवारी (दि. 12) तालुका पंचायत सभागृहात केडीपी बैठक पार झाली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. आमदार हलगेकर म्हणाले, वाळू व वीट व्यवसाय तालुक्याचा आर्थिक आधार आहेत. वाळूबंदीमुळे हे दोन्ही व्यवसाय अडचणीत आले आहेत. घरगुती कामांसह विकासकामांनाही वाळूबंदीचा फटका बसला आहे. अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय साधून वाळू वाहतूक त्वरित सुरु करावी. तीन महिन्यांपासून तालुक्यात ठाण मांडून असलेल्या हत्तींच्या कळपांचा अद्याप मुक्काम कायम आहे. त्यांच्याकडून पिकांचे नुकसान सुरु आहे. गवे, रानडुक्कर यांची समस्या कायमची आहे. यावर वनखात्याने तातडीने उपाययोजना करावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

नंदगडमधील संगोळी रायाण्णा वस्तुसंग्रहालयामुळे पर्यटकांची संख्या वाढली वाढल्याने नंदगड-कित्तूर मार्गावर बस सुविधा उपलब्ध करुन द्यावी. बैलूर येथील वीज उपकेंद्रासाठी तात्काळ निविदा काढून रखडलेले काम मार्गी लावावे. अंगणवाडीतील मुलांना तसेच गर्भवतींना कालबाह्य व निकृष्ट दर्जाचे धान्य पुरविले जात असून ही व्यवस्था सुधारावी. बीपीएल रेशन कार्डसाठी पैशांची मागणी केली जात आहे. हा प्रकार त्वरित थांबवावा. पोलिसांनी वाहनधारकांकडून वसूल केलेल्या दंडातून हेल्मेट पुरवावे, अशा सूचना त्यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

तालुका आरोग्याधिकारी डॉ. महेश किवडसण्णावर यांनी कापोलीत दवाखान्याची सोय केली असून चार ठिकाणी दवाखान्यांच्या निविदा प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले. शहरांतर्गत महामार्गावरील अतिक्रमणांचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून पुढील कार्यवाही हाती घेतली जाईल, अशी माहिती मुख्याधिकारी संतोष कुरबेट यांनी दिली. बैठकीला पंचहमी समितीचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी, ईओ रमेश मेत्री, बीईओ पी. रामाप्पा, आगार व्यवस्थापक संतोष बेविनकोप, ग्रेड टू तहसीलदार तंगोळी, बांधकाम खात्याचे संजय गस्ती, पोलिस निरीक्षक रविकुमार धर्मट्टी, उपनिरीक्षक एम. बी. बिरादार, डॉ मनोहर दादमी आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT