बेळगाव

Ration Server Issue: रेशनचा सर्व्हर ‘डाऊन’, संताप ‘अप’

सकाळपासूनच नागरिकांच्‍या दुकानासमोर रांगा : प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्‍याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : ऑगस्ट महिना संपण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना बहुतांश रेशन दुकानांना सर्व्हर समस्येचा त्रास सहन करावा लागत असून रेशन वितरणाचा खोळंबा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्व्हरच्या तांत्रिक समस्येमुळे रेशन वितरण प्रक्रियेला मोठा फटका बसला आहे. सकाळपासून रेशन दुकानांसमोर नागरिकांच्‍या रांगा लागत असून रेशनकार्डधारकांसह दुकानदारांनाही मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

सर्व्हरची समस्या तातडीने दूर करावी तसेच उर्वरित दिवसांत रेशन वितरण सुरळीत होण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी दुकनदरांनी केली होती. सदर रेशन वाटप करण्यासाठी दिवस वाढवून देण्याची मागणी केली जात आहे. केंद्राच्या कोट्यातील बीपीएल व अंत्योदय रेशनकार्डधारकांना ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे धान्य एकाचवेळी देण्यात येत आहे. बायोमेट्रिक प्रक्रियेसाठी सर्व्हरवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. वितरण प्रक्रिया मंदावली आहे. एका सदस्याचे बायोमेट्रिक घेण्यासाठी २० मिनिटांहून अधिक कालावधी लागत आहे.

ऑगस्ट महिना संपण्यास काही दिवस शिल्लक असतानाही बहुतांश रेशन दुकानांना धान्य उपलब्ध झालेले नाही. धान्याचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती दिली जात आहे. सर्व्हरच्या समस्येमुळे ई-केवायसी प्रक्रिया काही काळ स्थगित करण्यात आली असली तरी सर्व्हरची मूळ समस्या अद्याप कायम आहे. सर्व्हरची क्षमता वाढवून तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी रेशन दुकनदार करत आहेत.

रात्री उशिरापर्यंत दुकाने

सर्व्हरची समस्या, धान्याचा अपुरा पुरवठा आणि कमी कालावधी यामुळे या महिन्यात अनेक रेशनकार्डधारकांना धान्य मिळण्यापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून धान्य वितरण सुरळीत करावे, अशी मागणी रेशनदुकानदार संघटनेने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT