बेळगाव : अन्नभाग योजनेंतर्गत रेशनकार्डधारकांनी घेतलेले तांदूळ व धान्य काळ्या बाजारात विकले तर संबंधितांचे रेशनकार्ड रद्द करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मंगळवारी (दि.18) पत्रकाद्वारे दिला आहे. जिल्ह्यात 67,908 अंत्योदय रेशनकार्ड, 10,78,166 बीपीएल रेशनकार्ड व 3,26,507 एपीएल रेशनकार्ड अशी एकूण 14,72 581 रेशनकार्ड आहेत.
रेशनवर मिळणार्या तांदळाचा काळ्या बाजारात बेकायदेशीरपणे साठा, वाहतूक करणार्यांवर जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत कारवाई केली जाईल. रेशन वाटपाबाबत काही तक्रारी असल्यास संबंधित तहसीलदार कार्यालय किंवा अन्न व नागरी पुरवठा खाते उपसंचालक कार्यालय येथे तक्रार दाखल करता येतील. अन्नभाग्य योजनेंतर्गत मार्चमध्ये सरकारमान्य रेशन दुकानांतून रेशन वाटप केले जात आहे.
1 मार्चपासून महिन्याच्या अखेरीस सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत रेशन कार्ड असलेले सदस्य नि:शुल्क ई-केवायसी करून रेशन घेऊ शकतील. रेशन कार्डधारकांना त्यांचे बायोमेट्रिक दिल्यानंतर लगेच रेशन मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे.