बेळगाव : रेशनकार्ड दुरुस्ती प्रक्रियेला गेल्या दोन दिवसांपासून प्रारंभ झाला आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याने ही प्रक्रिया सुरु केली असून, संबंधित लाभार्थ्यांनी जवळच्या ग्रामवन किंवा बेळगाव वन कार्यालयात जाऊन आपल्या रेशनकार्डमध्ये सुधारणा करुन घ्यावी, असे आवाहन केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या या प्रक्रियेला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. या प्रक्रियेंतर्गत शिधापत्रिकेतील नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक किंवा सदस्यांची नावे जोडणी अथवा कमी करणे आदी कामे करता येणार आहेत. अन्नभाग्य योजनेंतर्गत दारिद्य्ररेषेखालील गोरगरीब जनतेला माणसी 7 किलो तांदूळ व 3 किलो ज्वारी वितरित केले जात आहे. अंत्योदय व बीपीएल कार्डधारकांना याचा लाभ मिळत आहे. मात्र, काही लाभार्थ्यांच्या रेशनकार्डमध्ये सदस्यांची नावे नसल्याने अशांना रेशनपासून वंचित राहावे लागत होते. शिवाय शासकीय कामातही अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागत होता. याची दखल घेत अन्न व नागरी पुरवठा खात्याने रेशनकार्ड दुरुस्ती प्रक्रियेला प्रारंभ केला आहे.
आता रेशनकार्ड दुरुस्ती प्रक्रियेला प्रारंभ झाला असून लाभार्थ्यांनी संबंधित कागदपत्रांची पूर्तता करुन आपल्या रेशनकार्डमध्ये दुरुस्ती करुन घ्यावी. यासाठी जात उत्पन्नाचा दाखला व आधार कार्ड आवश्यक असून लाभार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे अन्न व नागरी पुरवठा यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून नवीन रेशनकार्ड वितरण प्रक्रिया पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे, दारिद्य्ररेषेखालील गोरगरीब जनतेला अनेक शासकीय योजनांपासून व मिळणार्या रेशनपासून वंचित राहावे लागत आहे. अनेकांनी नवीन रेशनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. मात्र, सरकारकडून रेशनकार्ड वितरण प्रक्रिया ठप्प करण्यात आली आहे. त्यामुळे, रेशनकार्ड नसलेल्या लाभार्थ्यांचे लक्ष आता नवीन रेशनकार्ड वितरण प्रक्रियेकडे लागले असून सरकार मात्र या चाल ढकल करत असल्याचा आरोपही लाभार्थ्यातून होत आहे.
रेशनकार्ड दुरुस्ती प्रक्रियेला प्रारंभ झाला असून ज्या लाभार्थ्यांना नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक व इतर बदल करायचे असल्यास जवळच्या ग्रामवन किंवा बेळगाव वन कार्यालयात संपर्क साधावा. नवीन रेशनकार्ड वितरण प्रक्रियेबाबत मंत्रिमंडळात चर्चा सुरु आहे. लवकरच या प्रक्रियेलाही प्रारंभ होईल.- इलियास मणियार, अन्न निरीक्षक, बेळगाव