बेळगाव : यंदा मे महिन्यापासून सुरु असलेल्या पावसामुळे बेळगावच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख स्रोत असलेले राकसकोप जलाशय जुलै महिन्यात दोनवेळा तुडुंब झाले आहे. जलाशयाचे दोन दरवाजे बुधवारपासून (दि. 16) 9 इंचाने उचलून पाण्याचा विसर्ग सुरु ठेवला आहे.
यंदा जलाशय 2 जुलै रोजी पहिल्यांदा तुडुंब झाले होते. त्यावेळी 2 व 5 क्रमांकाचे दरवाजे 4 इंचाने उचलून मार्कंडेय नदीस विसर्ग सुरु करण्यात आला होता. पावसाची संततधार कायम राहिल्याने तब्बल दहा दिवस विसर्ग सुरु होता. त्यामुळे, मार्कंडेय नदीला पूर येऊन आजूबाजूची शिवारे जलमय जाली होती. अखेरीस पावसाचा जोर कमी झाल्यानंतर विसर्ग बंद करण्यात आला. यानंतर तो बंद झाला. काही दिवसांनी पावसाचा जोर पुन्हा वाढला. त्यामुळे, सोमवारी (दि. 14) 2 आणि 5 क्रमांकाचेच दरवाजे पुन्हा 7 इंचाने उचलून विसर्ग सुरु करण्यात आला.
बुधवारी जलाशयाची पाणीपातळी 2,474 फुटांवर पोचल्यामुळे दरवाजे 9 इंचाने उचलून विसर्ग सुरु झाला आहे. त्यामुळे, नदीला पुन्हा पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आगामी काही दिवसात पावसाला पुन्हा जोर येण्याची शक्यता असून जलाशयाच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ वाढ होण्याची शक्यता आहे. गतवर्षी 21 जुलै रोजी जलाशय तुडुंब झाले होता. यंदा 20 दिवस आधीच जलाशय तुडुंब झाले. जुलै महिन्यात पावसाचा जोर असतो असे गृहित धरुन हिंडलगा पंपिंग सेंटरमध्ये खबरदारी घेण्याची सूचना एलअॅण्डटी कंपनीने कर्मचार्यांना केली आहे.