Rakaskop Reservoir 
बेळगाव

Rakaskop Reservoir: गतवर्षीपेक्षा २४ फूट कमी पाणी

राकसकोप जलाशयाची स्थिती : दोन दिवसांत पाणीपातळीत एक फुटाने वाढ, मोठ्या पावसाची गरज

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : गतवर्षी जुलै महिन्यात पावसाने कहर केला होता. परंतु, यंदा पावसाळ्यालाच जुलैमध्ये सुरुवात झाली आहे. त्यामुळे, बेळगाव शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख स्रोत असलेल्या राकसकोप जलाशयात गतवर्षीपेक्षा तब्बल २४ फूट कमी पाणी आहे. गत दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे गुरुवारी (दि. २) पाणीपातळीत एक फुटाने वाढ झाली असली तरी गतवर्षीचा बॅकलॉग भरुन काढण्यासाठी मुसळधार पावसाची गरज आहे.

गतवर्षी याच दिवशी जलाशयाची पाणीपातळी २,४७१.७० फुटांवर पोचली होती. पण, यंदा ती फक्त २,४४७ फूट आहे. म्हणजेच मृतसाठ्यापेक्षाही एक फूट कमी आहे. गतवर्षीपेक्षा २४ फूट कमी पाणीसाठा जलाशयात आहे. गत दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे पाणीपातळी एका फुटाने वाढ झाली असली तरी मृतसाठ्यातूनच पाणीउपसा सुरु आहे.

गतवर्षी वळवाच्या पावसाने एप्रिलमध्येच हजेरी लावली होती. जूनमध्ये रितसर पावसाला सुरुवात झाली होती. यंदा मे महिन्यात वळीव पावसाने हजेरी लावली पण, तो पुरेसा नव्हता. त्यानंतर पावसाने हुलकावणी दिली. जून महिना पूर्ण कोरडा गेला. याचा परिणाम राकसकोप जलाशयातच्या पाणीपातळीवर झाला.

यंदा जून महिन्यातच मृतसाठ्यातून पाणी उपसा करण्याची वेळ पाणीपुरवठा मंडळावर आली. त्याचे नियोजन करण्याची जबाबदारी एलअँडटी कंपनीवर असल्याने पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली. आठ दिवसांआड होणारा पाणीपुरवठा बारा दिवसाआडवर गेला. त्यामुळे, शहरात पाणीटंचाई निर्माण झाली.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिकेने टंचाईग्रस्त प्रभागांत ३२ टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर १२ दिवसांआड होणारा पुरवठा केवळ दीड तासांवर आणला तर २४ तास पाणीपुरवठा होणाऱ्या भागात केवळ दोन तास पाणीपुरवठा सुरु झाला. आता जुलैमध्ये पावसाने हजेरी लावली असून जलाशयात एक फुटाने वाढ झाली आहे. राकसकोप जलाशयात पाणी जमा होण्यासाठी संततधार पावसाची आवश्यक्ता आहे. शहरात पाणीपुरवठा करताना एलॲंडटी कंपनीचे वेळापत्रक कोलमडले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT