बेळगाव : सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी हे आमचे नेते असून त्यांनी मुख्यमंत्री व्हावे, ही आमची इच्छा आहे. त्यांच्याकडे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद दिले तर पक्ष अधिक वेगाने वाढेल, असा दावा आमदार राजू सेट यांनी केला. ते बुधवारी (दि. २७) पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यात मुख्यमंत्री बदल आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांमुळे राजकीय परिस्थिती कमालीची तापली असून या नेतृत्व बदलाबाबत काँग्रेस आमदारांमध्ये वेगवेगळे सूर उमटत आहेत. हायकमांडचा निर्णय अंतिम मानत सतीश जारकिहोळी यांच्या नावाला पाठिंबा देण्यासोबतच नवीन आमदारांनाही मंत्रिमंडळात संधी मिळावी, अशी मते आमदारांकडून व्यक्त केली जात आहेत.
आमदार सेट म्हणाले, मुख्यमंत्री बदलासंदर्भात हायकमांडच्या निर्णयाचे सर्व आमदार आणि मंत्र्यांना पालन करावे लागेल. सिद्धरामय्या हे संपूर्ण राज्याचे मास लीडर आहेत. सतीश जारकिहोळी हे आमचे नेते असल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी आमची भावना आहे. त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिले तर पक्ष अधिक वेगाने वाढेल, यात शंका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बेळगाव शहराच्या आमदाराला आतापर्यंत मंत्रिपद मिळालेले नाही. आम्हालाही उत्तर कर्नाटकची सेवा करण्याची इच्छा असून आम्हीही मंत्रिपदासाठी इच्छुक आहोत. डी. के. शिवकुमार यांनीही पक्ष संघटनेसाठी मोठे परिश्रम घेतले असून हायकमांड सर्व गोष्टींचा विचार करुनच निर्णय घेईल, असे आमदार सेट यांनी सांगितले.
आमदार वैद्य यांच्याकडूनही समर्थन
सौंदत्ती यल्लम्मा प्राधिकरणाच्या बैठकीसाठी बेळगावात आलेले सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य यांनी सतीश जारकिहोळी यांना प्रदेश काँग्रेस अध्यक्षपद दिल्यास ते उत्तम काम करतील आणि पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी मदत करतील, अशी आशा व्यक्त केली. मला मंत्रिपदाची कोणतीही अपेक्षा नाही. मात्र चार-पाच महिन्यांपूर्वी बंगळुरात १३६ आमदारांपैकी प्रथमच निवडून आलेल्या सुमारे ४० टक्के आमदारांची बैठक झाली होती. त्यावेळी नवख्या आमदारांनाही संधी द्यावी अशी मागणी आम्ही केल्याचे त्यांनी नमूद केले.