Raid  Pudhari
बेळगाव

Karnataka Raids: बेळगावसह १२ जिल्ह्यांत छापे

ग्रामीण पायाभूत सुविधा विकास अभियंता जाळ्यात; मालमत्ता जप्त

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : बेळगावसह १२ जिह्यांतील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर लोकायुक्त पोलिसांनी कारवाई करत मंगळवारी पहाटे एकाच वेळी छापे टाकले. त्यात कर्नाटक ग्रामीण पायाभूत सुविधा विकास अभियंत्याचाही समावेश असून, त्याच्या बेळगावातील मालमत्तांचा शोध घेण्यात आला. केआरआयडीएलचे अधीक्षक अभियंता सन्‍न केंचप्पा असे त्याचे नाव असून, त्याच्या चित्रदुर्ग, दावणगिरी व बेळगाव येथील घरांसह एकूण पाच ठिकाणी छापे टाकण्यात आले.

राज्यातील काही सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या घोषित उत्पन्‍नाच्या स्रोतांपेक्षा जास्त संपत्ती जमा केल्याच्या महितीच्या आधारे लोकायुक्त अधिकाऱ्यांनी मंगळवारी हे छापे टाकून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली. लोकायुक्त अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने गुलबर्गा, दावणगिरी, चित्रदुर्ग, चिक्कमंगळूर, बंगळूरसह विविध जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकले.

चित्रदुर्ग प्लेन्स ॲथॉरिटीचे सचिव कृष्णा नाईक यांच्या दावणगिरी येथील सिद्धवीरप्पा लेआऊटमधील घर व चित्रदुर्ग येथील कार्यालयासह पाच ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. गुलबर्गा येथील सेवानिवृत्त पंचायतराज अधीक्षक अभियंत्याच्या घरावरदेखील लोकायुक्त एसपी सिद्धाराजू यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकला. गुलबर्ग्यातील गोदूताई घर, बिदर जिल्ह्यातील हळ्ळीखेड येथील घर व फार्महाऊस, हुमनाबादमधील दोन संकुलांसह पाच ठिकाणी छापा टाकण्यात आला आहे.

चिक्कमंगळूर येथील एसीएफ मोहन यांच्या घरावरही थिरुमलेश यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकला. त्याचवेळी वन अधिकाऱ्यांच्या घरावर व कार्यालयावरही छापा टाकण्यात आला. शिवाय, कडोरी येथे श्रीनिवासच्या बहिणीच्या घरावरही छापा टाकण्यात आला असून बेकायदेशीर मालमत्तांबाबत चौकशी सुरू आहे.

लोकायुक्तांच्या अधिकाऱ्यांनी बंगळूरमध्येही दोन ठिकाणी छापे टाकले आहेत. गृहनिर्माण मंडळाचे अतिरिक्त संचालक येलहंका येथील राजण्णा यांच्या कार्यालयीन निवासस्थानावर व वीज कंपनीचे सहायक अभियंता उदय कुमार यांच्या कार्यालयीन निवासस्थानावर छापे टाकण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT