R. Ashok's criticism: Betrayal of the people's trust in the assembly session.
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री निव्वळ लबाड असून त्यांनी सभागृहात दिलेली सर्व माहिती खोटी आहे. काँग्रेस पक्ष म्हणजे लबाडांचे घर आहे, अशा जळजळीत शब्दांत विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी आपली नाराजी व्यक्त केली. उत्तर कर्नाटकच्या विकासाबाबत सरकारने कोणतीही ठोस घोषणा किंवा निधी न दिल्याने या भागातील जनतेचा मोठा विश्वासघात झाला असल्याची टीका त्यांनी केली.
विधिमंडळ अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर ते शुक्रवारी (दि. १९) सुवर्णसौध आवारात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच आम्ही उत्तर कर्नाटकच्या प्रश्नांवर चर्चेची मागणी केली होती. त्यानुसार २१ तास चर्चाही झाली. मात्र, या चर्चेचे फलित म्हणजे मुसळ केरात गेल्यासारखे आहे.
तब्बल सोळावेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडणाऱ्या सिद्धरामय्या यांनीच आता उत्तर कर्नाटकवर अन्याय झाल्याचे कबूल करणे, हे त्यांच्या प्रशासकीय अपयशाचे लक्षण आहे. सौंदत्ती यल्लम्मा क्षेत्राचा विकास असो वा शहरातील तलावांचे पुनरुज्जीवन, कोणत्याही मंजूर योजनांची अंमलबजावणी करण्याची या सरकारची पात्रता नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
राज्यातील गृहलक्ष्मी योजनेचे पाच हजार कोटी रुपये कुठे गेले, असा सवाल विचारला असता सरकार ते शोधत असल्याचे सांगते, हे दुर्दैवी आहे. हे सरकार केवळ कर्जबाजारी आणि भ्रष्ट असून मुख्यमंत्र्यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी केवळ स्वतःचे राजकीय स्थान मजबूत करण्यासाठी या अधिवेशनाचा वापर केला आहे, असा टोलाही अशोक यांनी हाणला.