बेळगाव : गेल्या तीन महिन्यात सांबरा विमानतळावरुन 1,198 विमानांनी विमानतळावरुन उड्डाण केले असून त्यातून 82,522 प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर मार्चमध्ये सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली आहे. कार्गोसेवेलाही चांगला प्रतिसाद लाभला असून तीन महिन्यांत सहा टन मालवाहतूक झाली असल्याची माहिती सांबरा विमानतळाचे संचालक त्यागराजन यांनी दिली.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केलेल्या हवाई वाहतुकीच्या ताज्या आकडेवारीनुसार मार्चमध्ये महिन्यात सांबरा विमानतळावरुन 420 विमानांनी उड्डाण केले होते. त्यातून 28,370 प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे, महसुलात 6.18 टक्के वाढ झाली. जानेवारीत 402 उड्डाणे झाली असून 27,435 प्रवाशांनी प्रवास केला. तर ही संख्या अनुक्रमे 376 व 26,717 अशी होती. गेल्या तीन महिन्यांत कार्गोसेवेलाही चांगला प्रतिसाद लाभला आहे. या काळात एकूण सहा टन मालवाहतूक झाली.
गतवर्षी या विमानतळावरुन 3.47 लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. तर 5,591 विमानांनी उड्डाण केले होते. विमानाने प्रवास करणार्यांच्या संख्येत वाढ झाली असली तरी स्टार एअरने उडान योजनेंतर्गत सुरु केलेल्या प्रमुख मार्गावरील विमानसेवा बंद केल्या आहेत. त्याचा थेट परिणाम एप्रिलमधील विमानसेवेवर झाला आहे. त्यामुळे, एप्रिलमध्ये प्रवाशांच्या संख्येत घट होणार आहे.
उडान योजनेंतर्गत सुरु असलेली स्टार एअरची सेवा पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. विमानसेवेला बेळगावातून चांगला प्रतिसाद लाभत आहे. मार्च महिन्यात 28,370 प्रवाशांनी विमानाने प्रवास केला आहे.त्यागराजन, संचालक, सांबरा विमानतळ