बेळगाव ः पुढारी वृत्तसेवा
जीएसटी अधिकार्यांनी पकडलेल्या त्या मालवाहू वाहनातील साहित्याची सोमवारी (दि.14) सायंकाळी मोजदाद करण्यात आली. राज्य वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अधिकार्यांनी ही कारवाई केली असून लक्ष्मी स्टील नावाने व्यवसाय करणारा भामटा मात्र फरारी झाला आहे. केवळ वाहन चालक आणि वाहन ताब्यात घेण्यात आले असून हे प्रकरण अधिक चौकशीसाठी केंद्रीय वस्तू आणि सेवाकरकडे (सीजीएसटी) वर्ग केले जाणार आहे.
लक्ष्मी स्टील या नावाने निलेश कुमार नामक इसमाने मेन रोड, बसवण कुडची येथे कार्यालय सुरू केले होते. तो आपणही व्यावसायिक असल्याचे सांगत शहरातील इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक दुकानदारांना भेटत होता. त्यांच्याकडून उधारीवर साहित्य खरेदी करून तो त्याच्या मोबदल्यात धनादेश देत होता. त्यामुळे नामांकित शोरूमसह अनेक व्यापार्यांनी त्याला उधारी साहित्य दिले होते. मात्र, त्याच्यावर संशय आल्याने दोन दिवसांपूर्वी राज्य जीएसटी अधिकार्यांच्या मदतीने साहित्य पुण्याच्या दिशेने घेऊन जाणारे मालवाहू वाहन बेळगावात पकडण्यात आले. मात्र, यावेळी सदर भामटा पसार झाला. केवळ वाहन आणि चालक अधिकार्यांच्या जाळ्यात अडकले. निलेश कुमारने आपला मोबाईल बंद ठेवला असून त्याने व्यवसाय करत असताना जीएसटी भरला नसल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. उधारी साहित्य देऊन फशी पडलेल्या व्यापार्यांनी जीएसटी कार्यालयात गर्दी केली होती. पकडलेल्या वाहनातील साहित्याची अधिकार्यांच्या उपस्थितीत मोजदाद करण्यात आली. याप्रकरणी जीएसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून घेऊन हे प्रकरण अधिक तपासासाठी सीजीएसटी वर्ग करण्यात येणार आहे.
विविध साहित्याची वाहतूक करणारे मालवाहू वाहन पकडण्यात आले आहे. वाहनात नेमके कोणते साहित्य आहे, त्याची मोजदाद केली जाईल. याप्रकरणी जीएसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून घेऊन अधिक चौकशीसाठी सीजीएसटीकडे हे प्रकरण वर्ग केले जाईल. फशी पडलेल्या व्यापार्यांनी याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करावा की नाही, याबाबत ते निर्णय घेऊ शकतात.-एम. जे. रमेश बाबू, सहसंचालक राज्य जीएसटी विभाग