जत्राट : श्रीपेवाडी ही हालसिद्धनाथ आणि बसवण्णांची पुण्यभूमी आहे. येथे हालसिद्धनाथांचा दरबार भरला आहे. श्रीपेवाडी गावातील ग्रामस्थांना आशीर्वाद देत पिवळ्या भस्माचा महिमा वाढत जाईल. दीड महिन्याचे धान्य पिकेल. ते गोरगरीबांना उपयोगी ठरेल. राज्या-राज्यांत आंदोलने होतील. उसाला भाव मिळेल, अशी भाकणूक वाघापूर येथील अण्णासो डोणे महाराज यांनी कथन केली.
शनिवारी पहाटे श्रीपेवाडी येथे हालसिद्धनाथ देवाची पहिली मानाची भाकणूक कथन करताना अण्णासो डोणे महाराज भाकणुकीतून बकऱ्यांचा भाव एक लाख रुपयांपर्यंत जाईल. बैलांची किंमत बकऱ्यांच्या किमतीइतकी होईल. बकऱ्यांची किंमत कोंबड्यांच्या किमतीइतकी होईल. उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होईल. त्याचा भाव वाढत जाईल. साखरेचे भाव तेजी-मंदीच्या स्थितीत राहतील. गुळाचे भाव तेजीत राहतील.
साखर कारखान्यांशी संबंधित प्रश्नांवर राज्या-राज्यांत आंदोलने होतील. शेतकरीवर्ग चिंतेत राहील. तंबाखूचे दर वाढतील. पण तंबाखूच्या सेवनामुळे मोठ्या आजारांचा धोका निर्माण होईल. पाणीटंचाई आणि आरोग्याबाबत पाण्यासाठी आंदोलने होतील. अनेक प्रकारचे आजार उद्भवतील. काही आजारांवर औषधे मिळणे कठीण होईल. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी-जास्त प्रमाणात राहील. त्यापेक्षा मोठी महामारी येईल. विज्ञानाची प्रगती मानवासाठी घातक ठरू शकते. काही देश विषारी वायूंची निर्मिती करतील. राजकीय परिस्थितीबाबत देशात राजकीय गोंधळ वाढेल. मोठ्या पक्षांत फूट पडेल.
राजकीय नेते स्वार्थासाठी पक्षांतर करतील. राजकीय नेत्यांकडून जनतेच्या विश्वासाला तडा जाईल. भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचे प्रमाण वाढेल. दिल्लीतील सत्तेला मोठा धक्का बसेल. महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होईल. कर्नाटकातही राजकीय गोंधळ निर्माण होईल. सोने-चांदीचे भाव वाढतील. काही काळानंतर त्यांचे महत्त्व कमी होईल. रेल्वे, मोटारी आणि विमानांचे मोठे अपघात होतील. लहान वयात विवाह आणि मातृत्वाच्या घटना घडतील.
उन्हाळ्यात पाऊस आणि पावसाळ्यात उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण होईल. पावसाचे प्रमाण अनियमित राहील. दुष्काळ पडेल. नद्या आणि जमिनीच्या स्थितीत बदल होईल. विहिरी व तलाव आटून जातील. युवकांमधील बेरोजगारी वाढेल. पेट्रोल आणि गॅसच्या दरवाढीमुळे जनता हैराण होईल. सामान्य माणसाला जगणे कठीण होईल. शिवाजी महाराजांसारखे व्यक्तिमत्त्व पुन्हा जन्माला येईल. भगवा ध्वज राज्य करेल. तिरंगा ध्वज आनंदाने डौलत राहील, अशी भाकणूक अण्णासो डोणे महाराज यांनी कथन केली.