चिकोडी : माजी मंत्री व बिदर जिल्ह्यातील औरादचे आमदार प्रभू चव्हाण यांच्या मुलाने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करत महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील युवतीने कर्नाटक महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. माजी मंत्री प्रभू चव्हाण यांचे पुत्र प्रतीक चव्हाण याने माझ्याशी लग्न करतो, असे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून माझा वापर केला अशी तक्रार त्या तरुणीने केली आहे.
याविषयी औराद हुकराना पोलिस स्थानकात तक्रार दिली असता पोलिस तक्रार स्वीकारत नाहीत. त्यामुळे महिला आयोगाकडे तक्रार दिली आहे. 25 डिसेंबर 2023 रोजी घरच्यांनी साखरपुडा केला. त्यानंतर प्रतीकसोबत वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून दिले. प्रतिकने दि. 7, 24,27 मार्च व 8 एप्रिल रोजी लातूर येथे नेऊन माझ्यावर दबाव घालून शारीरिक संबंध ठेवले. तसेच 13 मे 2024 रोजी विमानाने शिर्डीला जाऊन एका खासगी हॉटेलमध्ये पुन्हा वेळ घालवला होता. त्यानंतर लग्नाची मागणी करूनदेखील त्याने टाळाटाळ केली आहे. त्यानंतर औराद येथील घरी जाऊन विचारणा केल्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये जोरात वाद झाला होता. याप्रकरणी पोलिसांत तक्रार देऊनदेखील कारवाई केली जात नाही. त्यामुळे महिला आयोगाकडे दाद मागल्याचे तक्रारीत म्हटले आहे.