कारवार : विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या अंकोला येथील पूजागेरी महाविद्यालयाच्या प्राध्यापकाला आठवडाभरात अटक करावी. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा स्थानिक विद्यार्थी संघटना व मच्छिमार नेत्यांनी गुरुवारी (दि. 6) जिल्हाधिकाऱ्यांना दिला.
प्राध्यापकाने एका विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याची घटना दहा दिवसांपूर्वी घडली आहे. त्यामुळे, स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याबाबत तक्रार नोंदवूनही संशयित आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. एका प्राध्यापकाने लैंगिक छळ केल्याचा आरोप गंभीर आहे. पीडित विद्यार्थिनी भीतीच्या सावटाखाली जगत आहे. दहा दिवस उलटूनही पोलिस संशयिताला अटक करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे, पीडितेवर अन्याय होत आहे.
याबाबत चौकशी केल्यास तपास सुरु असल्याचे पोलिस सांगत असून जलद कारवाईचे आश्वासन दिले आहे. विद्यार्थिनीची मानसिक स्थिती लक्षात घेऊन तिला त्वरित न्याय मिळाला पाहिजे. जर संशयिताला एका आठवड्यात अटक केली नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा असलेले निवेदन जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया के. यांना देण्यात आले. यावेळी विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी व स्थानिक मच्छिमार नेते उपस्थित होते.